आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारायण:अक्षरओळख नसलेल्या महिलेने ; नऊ महिलांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण करण्याचा ओलांडला शतकोत्तर टप्पा

शिरूर कासार25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ।।

याची अनुभूती शहरातील अगदी अक्षरओळख नसलेल्या महिलेने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा शतकोत्तर टप्पा पार करून दाखवली. त्यांचा विशेष गौरव सिद्धेश्वर संस्थानवर महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. या सत्कारामुळे अन्य भाविकांना प्रेरणा मिळेल असा विश्वास विवेकानंद शास्त्री यांनी व्यक्त केला.

दृढ निश्चय केल्यास अगदी असाध्य असलेलेसुद्धा साध्य होते. या न्यायाने शहरातील आठ महिला व एक पुरुष यांनी १०८ पारायणाचा संकल्प पूर्तीस नेला.यात काहींना अक्षरश: अक्षर ओळखदेखील नाही. मात्र भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी या न्यायाने ज्ञानेश्वरी वाचत आहेत. ज्ञानेश्वरीलाच जीवन समर्पित करणाऱ्या भीमाबाई डोंगरे यांनी ३०० पेक्षा अधिक पारायण केले तर लताबाई बडे यांनी २०९ पारायण तर ८६ वर्षीय भीमाबाई कासट यांनीदेखील ११३ पारायण केली.

या शिवाय गंगुबाई तळेकर, शालिनीताई देशपांडे, कमलबाई गाडेकर, शोभा भांडेकर, वच्छलाबाई चेमटे आणि ज्ञानेश्वर गाडेकर यांनी १०८ पारायण केली. या सर्व ज्ञानेश भक्तांचा भागवत कथेच्या समारोप प्रसंगी महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो फक्त आपला विश्र्वास अढळ असणे गरजेचे आहे.या भाविकांनी जे साध्य केले ते सर्वांना सुध्दा करता येईल आपण देखील गौरवपात्र व्हाल त्यासाठी सर्वांनी ज्ञानेश्वरी पारायण करावे असे आवाहन विवेकानंद शास्त्री यांनी केले.

३०० च्या वर पारायणे पूर्ण
ज्ञानेश्वरी पारायणाची प्रेरणा विजयकुमार पाटील यांनी दिल्यापासून मी पारायणालाच जीवन समर्पित केले असून ३०० च्या वर पारायण पूर्ण झाले.वै.आबादेव महाराज व विद्यमान महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी वारंवार केलेले कौतुक मला स्फूर्ती देत असल्याचे भीमाबाई डोंगरे यांनी सांगितले.

माउलींच्या कृपेने फक्त ज्ञानेश्वरीच वाचता येते
मी शाळा शिकले नाही,मला अक्षरओळख नाही.मात्र, माउलींच्या कृपेने फक्त ज्ञानेश्वरीच वाचता येते असे गंगुबाई तळेकर यांनी सांगितले.

ज्ञानेश्वरीशिवाय काहीच वाचत नाही
माझे वय ८६ वर्षे पूर्ण झाले.शरीर क्षीण झाले असले तरी मन आणि भावना मात्र थकलेल्या नाहीत.रोज ज्ञानेश्वरीशिवाय काहीच वाचत नसल्याचे भीमाबाई कासट यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...