आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:केजला अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी हिरवा कंदील‎

संतोष गालफाडे | केज‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज येथे अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू‎ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत‎ घेण्यात आला होता. गुरुवार, २ फेब्रुवारी‎ रोजी राज्य शासनाने या संदर्भातील आदेश‎ काढून निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे.‎ केज सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश‎ पदासह एकूण २२ पदांच्या निर्मितीलाही‎ प्रशासकीय मान्यता दिली असल्याने केज व‎ धारूर तालुक्यातील प्रकरणांचा निपटारा‎ केजच्या न्यायालयात होणार असल्याने‎ नागरिकांना आता अंबाजोगाईला जाण्याची‎ गरज भासणार नाही. त्यांचा वेळ व खर्च‎ वाचणार आहे.‎

प्रलंबित खटले, प्रकरणांची संख्या वाढत‎ गेल्याने केज येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र‎ न्यायालय सुरू करण्यात यावे अशी मागणी‎ सातत्याने होऊ लागली होती. केजला‎ अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्यासाठी‎ उच्च न्यायालयानेदेखील परवानगी दिली‎ होती. केजच्या तत्कालीन आमदार प्रा.‎ संगीता ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे‎ न्यायालयाची नवीन इमारत उभी राहिली‎ होती.

गतवर्षी या इमारतीचे बांधकाम पूर्ण‎ होताच राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य‎ न्यायमूर्ती होळचे भूमिपुत्र संभाजीराव शिंदे‎ यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्यांनीही‎ या अतिरिक्त व सत्र न्यायालयासाठी‎ पाठपुरावा केला होता. केज वकील संघाचे‎ अध्यक्ष अॅड. एस. एस. लाड यांच्या‎ नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने खासदार डॉ.‎ प्रीतम मुंडे यांची भेट घेऊन याप्रकरणी‎ प्रयत्न करण्याची विनंती केली होती.‎

केजला अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी १ न्यायाधीश, १ अधीक्षक, १‎ लघुलेखक, ४ वरिष्ठ लिपिक, ९ कनिष्ठ लिपिक, ३ बेलीफ आणि‎ सरकारी वकील कार्यालयासाठी १ वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, १‎ कनिष्ठ लिपिक अशा एकूण २२ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...