आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकडक उन्हाचे दिवस सुरू झालेले असून उकाड्याने दिवसा अंगाची लाहीलाही आणि रात्री विजेचे भारनियमन सुरू झाल्याने घामाने अंघोळ होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून रोज रात्री भारनियमन होत असल्याने नागरिकांची झोप उडाली असून उकाड्याने जीव हैराण होत आहे. दुसरीकडे अंधाराचा फायदा घेत चोऱ्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना जागते रहो, म्हणत रात्र काढण्याची वेळ आली आहे.
एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा जाणवू लागला असून सूर्यास्त होईपर्यंत उष्णतेची तीव्रता कमी होत नाही. कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिकांना फिरतीचे व अंग मेहनतीची कामे करताना जीव कासावीस होत आहे. अशा उष्ण वातावरणात नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल, टोप्यांचा वापर करीत झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत. त्यात शेतातील ज्वारी, गहू काढणी मळणीची कामे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात केली जात आहेत. त्यात आता विद्युत महावितरण कंपनीकडून भारनियमनात वाढ केली आहे. ग्रामीण भागात अगोदरच विजेचा लपंडाव सुरू असताना विजेच्या भारनियमनाची भर पडल्याने नागरिक वैतागले आहेत. रात्रीच्या वेळी भारनियमन केले जात असल्याने उकाड्यामुळे नागरिक घामाघूम होऊन कासावीस होत आहेत. घामाच्या धाराने नागरिकांची झोप उडाली असून डासांचा प्रादुर्भावामुळे घुसमट सुरू झाली आहे. शिवाय शहरी भागातही रात्रीचे भारनियमन असल्याने हीच अवस्था शहरी नागरिकांची झाली आहे. भारनियमन जून अखेरपर्यंत होणार असल्याने नागरिकांतून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंखे बंद होताच बच्चे कंपनी त्रस्त : उष्णतेमुळे लहान मुले तापाच्या आजाराला बळी पडत आहेत. त्यात विजेअभावी पंखे, कूलर बंद राहत असल्याने बच्चे कंपनी त्रस्त झाली आहे. त्यामुळे पालक वर्गाची चिंता वाढली आहे. उकाडा जाणवत आहे. विशेष म्हणजे डासांचा त्रास होत असून अनेक जणांना अख्खी रात्री जागून काढावी लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
पोलिसांवर ताण वाढणार?
चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून रात्री घरासमोरील बल्ब सुरू ठेवावेत, अशा सूचना पोलिस प्रशासनाकडून दिल्या जात होत्या. मात्र भारनियमनामुळे रात्र अंधारात काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यात अंधाराचा फायदा घेत चोऱ्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. परिणामी, पोलिस यंत्रणेचा ताण वाढण्याची शक्यता असून अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे गस्त घालण्यासाठी धावपळ वाढणार आहे.
असाही फटका बसू शकतो
ऐन उन्हाळ्यात भारनियमन केल्याने नागरिकांना शॉक बसला आहे. मात्र भारनियमनाच्या काळात विद्युत पुरवठ्याची साधने बंद राहत असल्याने विद्युत रोहित्रांतील ऑइल व विद्युत वाहिन्या चोरीस जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीलाही भारनियमनाचा फटका बसू शकतो, अशी चर्चा ही मागील भारनियमनाच्या काळात घडलेल्या चोरीच्या घटनांवरून होत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.