आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:केजच्या क्रांतीनगर भागाचा पाणी-पुरवठा सुरळीत करण्यास टाळाटाळ, नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा

केज17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये येत असलेल्या क्रांती नगर भागात दोन महिन्याला आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात असून बोअर ही बंद असल्याने नागरिकांवर विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. चार महिन्यापासून पाठपुरावा करून ही पाणी पुरवठा सुरळीत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या प्रभागाचे नगरसेवक अझहरोद्दीन शेख यांनी उपोषणाचा इशारा नगरपंचायतीच्या मुख्याधिऱ्यांना दिला आहे.

केज येथील नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. १ मध्ये क्रांती नगर हा भाग येत असून या भागात गोरगरीब, मागासवर्गीय समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. या भागाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ही जुनी असल्याने कालबाह्य झाली आहे. नव्याने पाईप लाईनचे काम न करता वेळोवेळी दुरुस्तीवर वेळ मारून नेली जात आहे. तर अशा मोडकळीस आलेल्या पाईपलाईनमधून दोन महिन्याला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे.

त्यामुळे या भागात असलेल्या बोअरवर नागरिक तहान भागवत होते. मात्र बोअर बंद पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ लागली. नागरिकांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ आल्याने या प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अझहरोद्दीन शेख यांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची आणि नवीन बोअर घेण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी नगरपंचायतीकडे लावून धरत चार महिन्यापासून पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा १६ जून रोजी नगराध्यक्ष व नगरपंचायतीच्या प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक अझहरोद्दीन शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...