आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बीड कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत ‘अबीर गुलाल’, ‘दर्शन दे रे भगवंता’, ‘खरा तो एकची धर्म’ या रचना सादर केल्या.
याप्रसंगी कारागृह अधीक्षक विलास भोईटे, वरीष्ठ निरीक्षक बक्सार मुलाणी, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, शेखर पाटील, प्रा.डॉ. रजाजी मसले, प्रा.डॉ.गणेश मोहिते, संगीत शिक्षक भरत लाळगे, प्रा.संजीव सुरोसे, सचिन संचेती, आनंद कोटेचा, प्रा.प्रशांत पवळ, पोलीस कर्मचारी वडणे, शेख, जयवाळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना कारागृह अधीक्षक विलास भोईटे म्हणाले, माणसांच्या विचारांमध्ये अध्यात्म आणि प्रबोधनाच्या माध्यमातून सुधारणा करण्याचा पायंडा शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या भजन आणि अभंग गायन स्पर्धेमुळे पडला आहे. हा उपक्रम बंदीजनांसाठी खूप उपयुक्त आहे. स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले की, बंदीजन म्हटले की, त्यांच्याकडे समाजाची पाहण्याची दृष्टी खूप वेगळी असते. बंदीजनांविषयी कडवट भावना असते. स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या कारागृहात जाण्याचा योग आला.
त्यावेळी प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, स्पर्धेमुळे बंदीजनांमध्ये सकारात्मक विचार वाढीस लागले आहेत. याप्रसंगी काही बंदीजनांनीही विचार व्यक्त केले. कारागृहात आल्यानंतर आम्ही बंदीजन सतत विचारात मग्न असतो. वाईट विचारच मनात येत असतात. भजन स्पर्धेमुळे वाईट विचारांना मुक्ती देण्यास सुरुवात झाली आहे. स्पर्धेत सहभागी झाल्याचा आनंद आहे, असे प्रकाश आपेट या बंदीजनाने सांगितले. दरम्यान, महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
सौ. कमलाबाई धारिवाल यांच्या स्मरणार्थ साहित्य भेट
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांना दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, १० जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फ्रेम व प्रबोधनात्मक ८२ पुस्तकांचा संचही मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.