आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी:जलयुक्त शिवार योजनेतील बोगस कामे व भ्रष्टाचार प्रकरणी सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भतानेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

परळी वैजनाथ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कृषी खात्याच्या दक्षता पथकाकडून दोन वेळेस चौकशी करण्यात आली होती.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मजूर संस्था व अभियंता यांच्या माध्यमातून २० लाखांचा तथाकथित भ्रष्टाचार केल्या प्रकरणात दोषी ठरलेल्या सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भतानेसह सहा अधिकाऱ्यांवर येथील तालुका कृषी अधिकारी अशोक अंबादासराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कृषी खात्याच्या दक्षता पथकाकडून दोन वेळेस चौकशी करण्यात आली होती. यात १३८ मजूर संस्था तसेच २९ गुत्तेदार व अभियंता, २८ अधिकारी यांच्यावर एफआयआर दाखल करून निलंबनाची कारवाई झाली. मात्र मुख्य आरोपी रमेश भताने विभागीय कृषी सहसंचालक सेवानिवृत्त यांच्यासह इतर ५ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येऊनही गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. याकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्हे दाखल करण्यास कृषी खात्यामार्फत विलंब करण्यात येऊ लागला. यामुळे वसंत मुंडे यांनी उप लोकआयुक्त कार्यालयात १४ आँक्टोबर २०२० ला ऑनलाईन सुनावणी द्वारे विभागीय कृषी सहसंचालक व पूर्वीचे जिल्हा कृषी अधीक्षक सेवानिवृत्त रमेश भतानेसह उपविभागीय कृषी अधिकारी विष्णू मिसाळ व प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवाराची नियमबाह्य बोगस कामे दाखवून बिले उचलल्या बाबत तक्रार करण्यात आली होती.

परळी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत योजनेमधील दोन्ही टप्प्यातील चौकशीत ८ कोटी ३६ लाख भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले. त्यामध्ये ५० टक्के गुत्तेदार व ५० टक्के अधिकाऱ्याकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या बोगस कामांची आणि भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी होऊन भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी (ता.१८) शहर पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांच्यासह भीमराव बांगर, शंकर गव्हाणे, दीपक पवार, सुनील रामराव जायभाय व कमल लिंबकर या सहा आरोपींविरुद्ध जलयुक्त शिवार योजनेत इ स २०१५ ते २०१७ दरम्यान १८ लाख ३२ हजार ३६६ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...