आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परळी पोलिसांची कामगिरी:24 तासांत 25 लाखांच्या लुटीचा छडा; वैजापूर येथे सिनेस्टाइल पाठलाग करून दोघे पकडले

परळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चोरट्यांनी कारमधून औरंगाबादच्या व्यापाऱ्याची लांबवली होती रक्कम

प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या औरंगाबाद येथील व्यापाऱ्याच्या कारमधून परळीत चोरांनी २५ लाख रुपये लांबवल्याची घटना गुरुवारी घडली हाेती. परळी पोलिसांनी तब्बल आठशे किलोमीटर सिनेस्टाइल पाठलाग केल्यानंतर वैजापूर परिसरात दोन चोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संतोष एकनाथ पाटील (४० ), पंढरीनाथ जतन प्रेमभरे (२३, दोघे रा. तुर्काबाद खराडी ता. गंगापूर, जि. औरंगाबाद)यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २४ लाख ८ हजार रुपयांसह गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. ही रक्कम लुटण्यासाठी चोरांनी तीन दिवस पाळत ठेवली होती हे तपासात समाेर आले.

औरंगाबादेतील मित्रनगर येथील व्यापारी संजय इंदरचंद गंगावाल हे मराठवाड्यात २० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करतात. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ते औरंगाबादहून कारने (एमएच २० इजे ५७७१) परळी शहरात आले हाेते. शहरातील मोंढा भागातील हनुमान मंदिराजवळ त्यांनी आपली कार उभी करून ते व्यापाऱ्यांकडे वसुलीसाठी गेले हाेते. दरम्यान, कारचालक बाजार समितीच्या आवारातील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यास गेला. याच वेळी चोरांनी कारच्या आतील सीटवरील बॅगमध्ये असलेले रोख २५ लाख रुपये लांबवले. कारचालक जेव्हा नाश्ता करून कारजवळ आला तेव्हा त्याला सीटवरील २५ लाख रुपये असलेली बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याने व्यापारी संजय गंगवाल यांना फोन करून पैशाची बॅग चोरीला गेल्याचे सांगितले. त्यानंतर गंगवाल यांनी परळी शहर पोलिसांना फोन करून चोरीच्या घटनेची माहिती दिली.

घटनास्थळी परळी शहर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी संजय गंगावाल यांच्या तक्रारीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर परळी शहर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. परळी शहर पोलिसांना रक्कम लुटीच्या प्रकरणातील चोरटे वैजापूर (जि. आैरंगबाद) परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोन्ही चोरांचा आठशे किलोमीटर सिनेस्टाइल पाठलाग करून दोन्ही चोरांना पकडले. पोलिसांनी चोरांकडून २४ लाख ८ हजार रुपयांसह गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली. ही कारवाई परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनात डी. बी. पथकाचे पोलिस जमादार भास्कर केंद्रे, सुंदर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, हनुमान मुंडे आदींनी केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक खरात करत आहेत.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडली घटना, दोन आरोपींना केली अटक

दिवाळीच्या पूर्वसंध्येला परळी शहरात सकाळी व्यापाऱ्याचे २५ लाख रुपये लुटीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली होती. परळी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत हा गुन्हा उघडकीस आणून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे परळी शहरवासीयांसह व्यापाऱ्यांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे.

बोअरवेल ऑपरेटरचा २५ हजारांचा मुद्देमाल लुटला

परळी | शहरातील बसस्थानक व रेल्वेस्थानकादरम्यान उभ्या असलेल्या बोअरवेलच्या एका ऑपरेटरला पळवून नेत त्याच्याकडील १५ हजार रुपये व १० हजार रुपये किमतीचा मोबाइल लुटल्याची घटना ११ नोव्हेंबर २०२० रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी एकास अटक केली आहे. तामिळनाडू राज्यातील पी. शेगर हे परळी बसस्थानक ते रेल्वे स्थानकादरम्यान रस्त्यावर थांबले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अंधारात पळवून नेत त्यांच्याजवळील नगदी १५ हजार रुपये व १० हजारांचा मोबाइल लुटला होता. याप्रकरणी सुनील सोळंके (रा. देवठाणा, ता. धारूर) यांच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध संभाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिस कर्मचारी भताने, राठोड, सानप, दुरगे यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा छडा लावला तेव्हा ही रक्कम राजू प्रभाकर गायकवाड याने लुटल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्याला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...