आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगती:काळानुरुप शेतकऱ्यांनी बदल; शून्य मशागत तंत्राचा अवलंब करत शेतीत प्रगती साधावी

अंबाजोगाई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळानुरुप शेतकऱ्यांनी बदल स्विकारत शेती प्रगतीकडे नेण्याची आज गरज आहे. त्यासाठी शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील शेतकरी खंडू दत्तात्रय माचवे यांनी शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करून टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड केलेल्या प्रक्षेत्राला राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी शनिवारी (ता.११ जून) भेट देऊन पाहणी केली.भेटीदरम्यान शून्य मशागतीमुळे खर्चात होणारी बचत व टोकण लागवड पद्धतीमुळे उत्पादनात होणारी वाढ याविषयी चर्चा केली.

शून्य मशागतीमुळे एकरी ६ हजार रुपये खर्चात बचत होत असून टोकण पद्धतीमुळे बियाण्याची ५० टक्के बचत होऊन एकरी फक्त १२ किलो बियाणे पुरेसे होते. सरी-वरंब्यावर लागवड केल्याने शेतामध्ये हवा खेळती राहून कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन कीड रोग व्यवस्थापनासाठी होणाऱ्या खर्चाची बचत होऊन उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ होते.मागील २ वर्षांपासून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून सोयाबीनचे एकरी २१ क्विंटल उत्पादन काढणारे शेतकरी अरूण देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

अरुण देशमुख यांनी मागील २ वर्षापासून शेतामध्ये नांगरणी, मोगडणी, वखरणी न करता जुन्याच वरंब्याला माती लावून सोयाबीन टोकण केली व मशागतीवर होणारा प्रति एकरी ६ हजार रुपये खर्च वाचवला याबाबतीत मनोगत व्यक्त केले. कृषी आयुक्तांनी शून्य मशागत तंत्रज्ञान व टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी करणे बाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यासह शेतकऱ्यांशीही संवाद साधत माहिती घेतली. काही अडचणी असतील तर कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर, तालुका कृषी अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडवखेलकर, मंडळ कृषी अधिकारी राजाराम बर्वे, गोविंद ठाकूर, पंडीत काकडे, उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांच्यासह सर्व कृषी पर्यवेक्षक कृषी सहायक, शेतीशाळा प्रशिक्षक, शेतकरी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...