आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालविवाहाचा बळी:अल्पवयीन तरीही विवाह, सतत माहेरी येते म्हणून बापाने आवळला गळा; पोलिसांकडून 24 तासांत खुनाचा उलगडा

वडवणी/बीड10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आईसमोरच घोटला गळा, कुणाला सांगितल्यास तिलाही दिली जीवे मारण्याची धमकी
  • मे, जूनमध्ये बालविवाहाची 7 प्रकरणे; 5 विवाह राेखले, 2 प्रकरणांत गुन्हे नोंद

अवघ्या तेरा वर्षांच्या मुलीचा वर्षभरापूर्वी विवाह केला गेला, ज्या वयात हातात बाहुली घेऊन खेळायचं वय, संसार म्हणजे काय हे कळायच्याही आधी संसाराचं ओझं खांद्यावर आलं. आईवडिलांना सोडून नव्या माणसांत करमेना म्हणून सतत माहेरी येणाऱ्या मुलीचा बापानेच गळा आवळून खून केल्याची घटना वडवणी तालुक्यातील पिंपळ्यात घडली. तीन दिवसांनंतर मुलीचा मृतदेह सापडला. यामुळे जिल्ह्यात बालविवाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मे व जून या दोन महिन्यांत जिल्ह्यात बालविवाहाच्या सात घटना समोर आल्या आहेत यातील पाच विवाह रोखण्यात यश आले तर दोन प्रकरणांत गुन्हा नाेंद केला गेला आहे.

वडवणी तालुक्यातील पिंपळा येेथे शीतल दादासाहेब तोगे (१४) या विवाहितेचा मृतदेह एका उसाच्या शेतात मंगळवारी आढळून आला होता. वडवणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश टाक यांनी या खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा केला. मृत शीतलचा खून वडील प्रकाश काशीनाथ भांगे यानेच रविवारी रात्री गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. खून करून त्याने मृतदेह उसाच्या शेतात टाकला होता. दोन दिवस शीतल बेपत्ता असल्याची चर्चा केली गेली अाणि मंगळवारी तिचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना दिली गेली होती. या प्रकरणी मंगळवारी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला गेला हाेता. यानंतर तपासाची चक्रे गतिमान झाली अन् पोलिसांच्या चौकशीत बाप अडकला. त्याच्यावर संशय वाढल्याने टाक यांनी प्रकाश याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

बालविवाह कारण : 

सतत माहेरी येते म्हणून खून : प्रकाश भांगे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. ते मजुरी करतात. मोठी मुलगी विवाहित असून मधल्या शीतलचा विवाह सुमारे वर्षभरापूर्वी वडवणी तालुक्यातीलच चिखल बीड येथील दादासाहेब तोगे यांच्याशी झाला होता तेव्हा शीतलचे वय होते अवघे तेरा ते साडेतेरा वर्षे. इतक्या कमी वयात संसाराची जाण नसलेली शीतल नव्या जबाबदाऱ्यांसाठी शारीरिक आणि मानसिकरीत्या तयार नव्हती. त्यामुळे ती सारखी माहेरी आई, वडिलांकडे येत होती. तिला परत सासरी नेऊन सोडले तरी तिथे करमत नसल्याचे सांगत ती काही दिवसांत पुन्हा माहेरी यायची. यामुळे वडील प्रकाश हे शीतलला मारहाण करत असत. रविवारीही त्यांनी मारहाण करून शीतलचा गळा आवळून खून केला. बालविवाहामुळेच हा प्रकार घडला.

आईसमोरच घोटला गळा, कुणाला सांगितले तर तुलाही मारून टाकेन

मृत शीतलचा प्रकाश भांगे याने आईसमोरच गळा घाेटला. मुलीचा ख्ून केल्याची बाब कुणाला सांगितली तर तुलाही मारून टाकेन, अशी धमकी त्याने दिली होती. मात्र, मुलीचा मृतदेह पाहिल्यावर आईला आक्रोश रोखता आला नाही. तिनेच प्रकाशच्या कृत्याचा भांडाफोड केला. या घटनेने पिंपळा गावावर शोककळा पसरली असून पोलिसांनी आपल्याच मुलीचा खून करणाऱ्या पित्याला अटक केली आहे.

चाइल्ड लाइन, बालहक्क समिती कार्यकर्ते सजग, १०९८ हेल्पलाइन

बीड जिल्ह्यात बालविवाह होत असेल तर महिला बालविकास विभाग, चाइल्ड लाइन, बालकल्याण समितीच्या सदस्यांशी संपर्क करावा. १०९८ ही यासाठी हेल्पलाइन आहे, असे आवाहन महिला बालविकास अधिकारी आर. डी. कुलकर्णी, बालकल्याण समितीचे सदस्य तत्त्वशील कांबळे व चाइल्ड लाइनच्या सविता जाधव यांनी केले आहे.

प्रश्न ऐरणीवर : दोन महिन्यांत सात बालविवाहाच्या घटना समोर

मे-जून महिन्यात बालविवाहाच्या ७ घटना बीड जिल्ह्यात समोर आल्या आहेत. यामध्ये बीड तालुक्यात १ बीड शहरात, गेवराई तालुक्यात २, पाटोदा तालुक्यात १, शिरूर तालुक्यात एक, वडवणी तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये गेवराई तालुक्यातील देव पिंपरीत झालेल्या बालविवाहाच्या प्रकरणात गुन्हा नोंद केला गेला, तर वडवणी पोलिसांतही गुन्हा नोंद आहे. पाच बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले.

अपर अधीक्षक भोर यांची घटनास्थळी भेट :

घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी अंबाजोगाई विभागाच्या अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एपीआय महेश टाक यांनी पंचनामा व इतर प्रक्रिया पूर्ण केल्या.

बातम्या आणखी आहेत...