आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेने सापडला आष्टीतला कोरोनाबाधित रुग्ण

बीड3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
आष्टी तालुक्यातील पिंपळा कोयाळ गावाला बुधवारी  तहसीलदार नीलिमा थेऊरकर व अन्य  अधिकाऱ्यांनी भेट देऊन गावातील परिस्थितीची माहिती घेतली. - Divya Marathi
आष्टी तालुक्यातील पिंपळा कोयाळ गावाला बुधवारी तहसीलदार नीलिमा थेऊरकर व अन्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन गावातील परिस्थितीची माहिती घेतली.
  • यंत्रणेने पहाटेच घेतले ताब्यात

अमोल मुळे

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्काचा इतिहास शोधताना नगर प्रशासनाला पिंपळा (ता. आष्टी) येथील दोन जण संपर्कात आल्याची माहिती मिळाली हाेती. अहमदनगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पत्र पाठवून याबाबत कळवले. यानंतर तत्काळ या व्यक्तींचा शोध घेतला गेला. या पैकी एक जण कोरोनाबाधित आढळून आला. नगर व बीड प्रशासनाच्या समन्वयामुळे बीड जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्ण वेळीच शोधण्यात यश आले. अन्यथा पुढील काळात काेराेना व्हायरसची बाधा झालेल्या या रुग्णाच्या अनेक जण संपर्कात येऊन काेराेनाबाधित हाेऊ शकले असते.

नगर जिल्ह्यात अलमगी येथे काही दिवसांपूर्वी एक धार्मिक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात सहभागी एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे नगर प्रशासनाच्या तपासणीत आढळले होते.  ४ एप्रिल रोजी त्याचा अहवाल नगर प्रशासनाला मिळाला. नगर प्रशासनाकडून बाधित व्यक्तीच्या संपर्कातील इतर लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू असतानाच आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील दोन जणांची नावे समोर आली. मात्र ते नगर जिल्ह्यात नसल्याचे चौकशीत कळले. हे दोघेही  बीड जिल्ह्यातील मूळ गावी असल्याचे कळताच नगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, नगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांना संपर्क करून या संशयित रुग्णांची माहिती दिली.

यंत्रणेने पहाटेच घेतले ताब्यात

कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती मिळताच सोमवारी पहाटेच जिल्हा आरोग्य यंत्रणेने पिंपळा येथून दोघांनाही ताब्यात घेऊन नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथूनच त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवले. मंगळवारी मध्यरात्री दोघांपैकी एकाला कारोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला तर बुधवारी दुपारी दुसरा निगेटिव्ह असल्याचे समोर 
आले. 

संसर्ग रोखण्यास मदत

वेळीच हा रुग्ण ट्रेस झाल्याने इतर अनेकांच्या संपर्कात येऊन जिल्ह्यात या विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखणे शक्य झाले. अन्यथा हा रुग्ण कळला नसता तर जिल्ह्यात संसर्गाची साखळीच तयार होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. सध्या पिंपळा येथील या काेराेनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती प्रशासन घेत आहे. 

डीएचओंचे मित्रत्व कामी 

बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. व नगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे हे एकमेकांच्या संपर्कात होते. शिवाय, संदीप सांगळे यांनी बीडमध्येही जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम केल्याने त्यांना बीड जिल्ह्याची चांगली माहिती होती. डीएचओंचे मित्रत्व संकटकाळात जिल्ह्याच्या कामी आले. 

बातम्या आणखी आहेत...