आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी विशेष लक्ष दिले आहे. यासाठी राज्यातील ७ मंदिरांची पहिल्या टप्प्यात निवड केली गेली आहे. यासाठी १०१ कोटींचा निधीची तरतूदही केली गेली आहे. यात, माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिराचा समावेश आहे. प्राचीन मंदिरांच्या कायापालटाचा हा उपक्रम मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येते मात्र ७ पैकी ५ मंदिरे भारतीय पुरातत्त्व खात्यांतर्गत येत असल्याने हे काम रखडण्याची चिन्हे आहेत. मात्र पुरुषोत्तमपुरी हे पुरातत्त्व खात्यांतर्गत येत नसल्याने मंदिराच्या विकासाला संधी आहे.
शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बीकेसी मैदानावर जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी राज्यातील प्राचीन मंदिराच्या संवर्धन व विकासासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी निधीची तरतूदर केली असून केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व विभागाने मात्र या उपक्रमात खोडा घातल्याचा आरोप केला होता. दरम्यान, राज्य शासनाने निवडलेल्या सात प्राचीन मंदिरांत पुरुषोत्तमपुरी येथील भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिराचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
तीन टप्प्यांत होऊ शकतात कामे
प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या शासनाच्या आराखड्यानुसार तीन टप्प्यांत कामे केली होईल. पहिल्या टप्प्यात पडझड झालेले छत, प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, शिखर, ओवऱ्या खांब व घुमटावरील नक्षीकाम दुरुस्त केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात जुन्या बांधकामाला साजेल असे नवे बांधकाम केले जाईल. फरशी बसवली जाईल. आवश्यक तिथे पुनर्बांधणीही केली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात पर्यटक, भाविक यांच्यासाठी सुविधा, पिण्याचे पाणी, भक्त निवास, स्वच्छतागृह, रस्ते यांची कामे होईल.
काय आहे मंदिराचा इतिहास
भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर गोदावरी नदीच्या पोटावर वसलेले आहे. मंदिराचे स्थापत्य कलेतील वेगळेपण असे की, मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या विटा चक्क पाण्यावर तरंगतात. हे मंदिर इसवी सन १३१० मध्ये रामचंद्र देव यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने उभारले. इतिहासाच्या दृष्टीने पुरुषोत्तमपुरीस मोठे महत्त्व असून रामचंद्र देव यादवांचा शेवटचा ज्ञात ताम्रपट इथेच सापडला आहे. अधिक मासात महिनाभर इथे मोठी यात्रा भरते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.