आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जिल्ह्यातील काेराेना संसर्ग अधिक वेगाने पसरू नये, यासाठी पुन्हा एकदा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पाचवी ते नववी आणि ११ चे वर्ग १० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता. दुसरीकडे गेवराईत गुरुवार (दि. २५) पासून कोरोनाच्या सुपर स्प्रेडर्सच्या शोधासाठी व्यापाऱ्यांच्या अँटिजन टेस्ट केल्या जाणार आहेत.
कोरोनाची दुसरी लाट राज्यात वेग धरत असल्याने सर्वत्र सतर्कता आहे. अनेक जिल्ह्यांत शाळा बंदचा निर्णय घेतला जात आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातही आतापर्यंतच्या चाचण्यांत २८ शिक्षक, ६ विद्यार्थी आणि २ इतर कर्मचारी असे एकूण ३६ जण बाधित आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याबाबत पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवले होते. सीईओ अजित कुंभार यांनी शाळा बंद करणे योग्य असल्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी १० मार्चपर्यंत ५ वी ते ९ वी व ११ वीचे वर्ग १० बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाॅझिटिव्ही दर १३% : दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचा दर १३ टक्के आहे, तर मृत्यूदरही चार टक्क्यांपर्यत जाऊन पोहोचला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यात ११ महिन्यांत प्रशासनाला यश आलेले नाही. बीड जिल्हा रुग्णालयापेक्षा अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाचा मृत्यूदर अधिक आहे. तर, जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के इतका आहे.
एकाचा मृत्यू; ५७ नवे रुग्ण
बुधवारी ५७ रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई १९, आष्टी ६, बीड २१,धारूर १ व गेवराई, केज , माजलगाव, परळी, शिरूर प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.बुधवारी १९ जणांनी कोरोनावर मात केली. विडा (ता.केज) येथील ८४ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. एकूण बळींचा आकडा ५७४ इतका झाला आहे.
गेवराईत मोहीम आजपासून होणार चाचण्या
गेवराईत सुपर स्प्रेडर्सचा शोध घेतला जाणार असून यामध्ये गुरुवारी (२५ फेब्रुवारी) हातगाडीचालक, रिक्षाचालक, खासगी प्रवासी वाहतूक करणारे चालक, २६ रोजी कपडा, भांडी व्यावसायिक व एसटी कर्मचारी, २७ रोजी पेट्रोलपंप कर्मचारी, सलून चालक, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल्स व्यावसायिक, १ मार्च रोजी शेती अवजार विक्रेते, कृषी सेवा केंद्र चालक, २ मार्च रोजी मोबाइल विक्रेते, मेडिकल्स, जीम चालक, क्लासचालक, ३ रोजी जनरल स्टोअर्स, अॉटोमोबाइल्स, गॅरेज चालक, ४ रोजी हॉटेल चालक, पानटपरीचालक, बारचालक, ५ रोजी किराणाचालक, ६ मार्च रोजी मटन विक्रेते यांच्या चाचण्या होणार तर, ७ ते १० मार्च दरम्यान संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या होतील.
२ लाख ९ हजार चाचण्या
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ९,९०२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. १८ हजार ५५९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यापैकी १ लाख ९१ हजार ३४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १७ हजार ६७४ कोरोनामुक्त झाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.