आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्रामपंचायत निवडणुकीमुळे प्रवाशांची दमछाक

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीत विविध कारणांनी अनेकांचा आर्थिक फायदा होत असताना यात राज्य परिवहन महामंडळही मागे राहिलेले नाही. निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाने वापरलेल्या बसेसमधून राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाच्या तिजोरीत ५४ लाख रुपयांची भर पडली आहे. एकूण २४७ बसेस दोन दिवसांत वापरल्या गेल्या असून, या बसेसचा ९८ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास झाला आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर ड्यूटी लावलेले कर्मचारी आणि पोलिस केंद्रांपर्यंत मतपेट्यांसह पोहोचवण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा हे कर्मचारी मुख्यालयी आणून सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बुक केल्या आहेत. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस या बससेची बुकिंग करण्यात आलेली होती.

आगारनिहाय अशा बसेस बीड आगारातून ४७, पाटोदा आगारातून पाटोद्यासाठी ९ आणि शिरूरसाठी ७ अशा एकूण १६ बसेस, आष्टी आगारातून ४० बसेस, गेवराई आगारातून ३० बसेस, माजलगाव आगारातून १३ बसेस, धारूर आगारातून धारूरसाठी १३, वडवणीसाठी १० आणि केजसाठी २२ अशा एकूण ४५ बसेस, परळी आगारातून २३ बसेस आणि अंबाजोगाई आगारातून ३३ बसेस अशा एकूण बीड विभागासाठी २४७ बसेस बुक केल्या गेल्या आहेत.

निवडणुकीमुळे एसटीला फायदा ग्रामपंचायत निवडणुकीतून ५४ लाख ३४ हजार रुपये दोन दिवसांत मिळणार आहेत. याचा एसटीला फायदा होत आहे. - अजयकुमार मोरे, विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, बीड

प्रवाशांना बसला फटका मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणूक प्रक्रियेत अडकल्याने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना मात्र शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस त्रास सहन करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...