आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता मिटली:बीडसह 3 जिल्ह्यांची चिंता मिटली; मांजरा त 44.29% पाणीसाठा

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याच्या तीन महिन्यांच्या कालावधीत मोठे पाऊस न झाल्याने धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात मोठी आवक झालेली नाही. मात्र, आता ३०.८२२ दलघमी आवक झाली असून धरणात ४४.२९ टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या लातूर, बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यातील ५ शहरांसह अनेक गावांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

धनेगाव येथील मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. तर धरणातून वर्षभरासाठी लातूर शहराला २४ दलघमी, लातूर एमआयडीसीला ३ दलघमी, अंबाजोगाई शहराला ३.५ दलघमी, कळंब शहराला २.२५ दलघमी, केज व धारूर शहराला १.५० दलघमी, मुरुड-शिराढोण या गावांना ०.५ दलघमी, युसूफवडगावला ०.५ दलघमी यासह इतर गावांसाठीच्या लहान योजनांसाठी अंदाजे २६ ते २७ दलघमी पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यापूर्वी धरणात ९४.६९१ दलघमी पाणीसाठा होता. तर पावसाळ्याच्या ३ महिन्यांच्या कालावधीत मोठे पाऊस झाले नाहीत. त्यात १ महिना पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील लहान-मोठ्या तलावात आणखी अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही.

परिणामी, मांजरा धरणात मोठी आवक झालेली नाही. परंतु धरणात क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे आणि मांजरा नदीतून आलेल्या पाण्यामुळे तीन महिन्यांच्या कालावधीत ३०.८२२ दलघमी इतकी पाणीसाठ्याची भर पडली आहे. तर ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत धरणात १२५.५१३ दलघमी इतका पाणी साठा झाला आहे. धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. मात्र धरणात उपलब्ध असलेला ४४.२९ टक्के पाणीसाठा हा वर्षभरासाठी धरणावर अवलंबून असलेल्या लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील पाच शहरांसह अनेक गावांची पाणीपुरवठा योजनांसाठी पुरेसा आहे. त्यामुळे वर्षभराची टंचाईची चिंता मिटली आहे. शिवाय पाण्याचा अपव्यय टाळून वापर केल्यास टंचाईच्या काळात सिंचनासाठी पाणी वापरता येऊ शकते. मात्र येणाऱ्या काळात मोठे व परतीच्या पावसावर धरण भरण्याची अपेक्षा आहे.

ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी आणखी पावसाची प्रतीक्षा कायम
केज तालुक्यात मोठे पाऊस न झाल्याने लहान-मोठ्या तलावात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे या तलावातून सुरू असलेल्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आणखी पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने सिंचन क्षेत्राच्या दृष्टीने पाऊस महत्त्वाचा आहे.

बातम्या आणखी आहेत...