आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांनी सजगता दाखवली:मुख्याध्यापकाने अपहार केलेले पैसे वसूल करून शाळा बांधकाम

दिंद्रुड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील नाखलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांत विविध योजनेंंतर्गत आलेले पैसे येथील मुख्याध्यापकाने हडप केल्याचा प्रकार नाकलगाव ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर, ते हडप केलेले पैसे परत मिळवत ग्रामस्थांनी सजगता दाखवली असून शाळेचे बांधकाम चांगल्या दर्जाचे होत आहे.

येथील मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे यांनी वर्ष २०२० - २१ या कार्यकाळात अनेक योजनेतील एक लाख दोन हजार शंभर रुपये हडप केल्याचा प्रकार येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास झोडगे व ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यानंतर मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी माजलगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे नाकलगाव ग्रामस्थांनी केली, मात्र, याची दखल न घेतल्याने १० जुलै रोजी शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते. या शाळेवर माजलगाव गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी दिवसभर ठाण मांडून ग्रामस्थ व मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

बैठकीत मुख्याध्यापकाने घोटाळा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घोटाळा केलेली सर्व रक्कम मुख्याध्यापकाने गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिली. रक्कम बी. ओ. बेडसकर यांनी शाळेतीलच एका शिक्षकाच्या बँक अकाउंटवर वर्ग केली असल्याचे बेडसकर यांनी सांगितले. पाच जणांची समिती या प्रकरणात नेमून त्या पैशाचा यथायोग्य वापर करत शाळेसाठी वर्गखोली दुरुस्ती, छत दुरुस्ती, शौचालयाची दुरुस्ती करण्यात आली. या प्रकरणात ग्रामस्थांच्या सजगतेमुळे घोटाळा तर उघड झाला. मात्र गेली दोन महिने होऊन ही शिक्षण विभागाद्वारे संबंधित मुख्याध्यापकावर कसलीही कारवाई केली नसल्याचे निदर्शनास येत आहे. कारवाईचा अहवाल आम्ही पाठवला असल्याचे गटशिक्षणाधिकारी बेडसकर सांगत असून, बीड जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याची मागणी दिंद्रुड पत्रकार संघ व नाकलगाव ग्रामस्थांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...