आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पोलिसाचे हाल:रात्री कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णवाहिका न आल्याने सकाळपर्यंत चेकपोस्टवर ड्यूटी करून दुचाकीवर गेला रूग्णालयात!

अमोल मुळे|बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वॅब देऊनही लावली होती ड्युटी ; पाॅझिटिव्ह आल्यावर आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा

कोरोनाच्या काळात ड्युटी करणा-या पोलिसाचे एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे परळीत मात्र कोरोना झालेल्या एका कर्मचा-याचे पोलिस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे हाल झाले. रात्री कोरोना बाधित येऊनही या पोलिसाला सकाळपर्यंत चेक नाक्यावर ड्युटी करावी लागली. रात्रभर रुग्णवाहिका न आल्याने सकाळी ड्युटी पूर्ण करुन त्याने दुचाकीवर रुग्णालय गाठले.

परळी तालुक्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. एसबीआय बँकेपासून परळीत कोरोनाचा उद्रेक झाला. शनिवारी देखील परळीत कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळून आले. यापैकी निम्मे रुग्ण धर्मापुरीचे आहेत तर चार पद्मावती कॉलनी, एक गणेशपार आणि एक पोलीस कॉलनीतील आहे. या बाधितात शहर ठाण्यातील ४२ वर्षिय पोलिस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. हा कर्मचारी बीड-लातूर सीमेवरील जोडवाडी चेकपोस्टवर कर्तव्यास होता. शुक्रवारी त्याचा ‌‌स्वॅब‌ घेण्यात आला होता. त्यानंतरही त्यास शनिवारी ड्युटी देण्यात आली. शनिवारी दिवसभर या कर्मचाऱ्याने अन्य दोन सहकारी आणि एका पोलीस अधिकाऱ्यासोबत जोडवाडी चेकपोस्टवर ड्युटी केली. रात्री उशिरा त्यांना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने कोविड कक्षात दाखल करणे गरजेचे होते, तरीसुद्धा रुग्णवाहिका पाठवण्यात आली नाही. पाॅझिटीव्ह असतानाही रात्रभर त्या कर्मचाऱ्याने इतरांना लागण होणार नाही याची काळजी घेत कर्तव्य बजावले आणि सकाळी आठ वाजता सुटी झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे आज स्वॅब‌ घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

स्वॅब कुणीही देत त्यात काय

दरम्यान, शहर ठाण्याऐवजी संभाजीनगर ठाण्याचा हा कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती होती तेंव्हा संभाजीनगर ठाण्याचे पीआय बाळासाहेब पवार यांना विचारले असता बाधित कर्मचारी शहर ठाण्याचा आहे.स्वॅब दिल्यावर ड्युटी करु नये असे नाही स्वॅब कुणीही देत, त्यांनी सहज स्वॅब दिला हता अशी प्रतिक्रिया दिली तर, शहर ठाण्याचे पीआय हेमंत कदम यांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी फोन स्वीकारला नाही.

दुचाकीवरुन गाठले रुग्णालय

दरम्यान, रात्री कोरोनाबाधित आलेला हा कर्मचारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत चेक नाक्यावर ड्युटी करत होता. कोरोना होऊनही व संपर्क करुनही रुग्णवाहिका घ्यायला येत नसल्याचे पाहून रविवारी सकाळी तो स्वत:च्या दुचाकीवरुन परळी उपजिल्हा रुग्णालयात गेला.वाटेत त्याला काही त्रास होऊ नये म्हणून त्याचे तीन सहकारी त्याच्या दुचाकीच्या मागे वाहन घेऊन गेले होते.

एसपी, जिल्हाधिकारी कारवाई करणार का?

दरम्यान, एकीकडे कोरोना योद्ध्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्यासाठी पोलिस बॅन्ड वाजवणारे एसपी हर्ष पोद्दार या प्रकरणात दोषींवर काय कारवाई करतात याकडे लक्ष आहे. तर, आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळपणावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार कडक भूमीका घेतात का हे पाहणेही आवश्यक आहे.

स्वॅब दिल्यावर क्वारंटाईन असायला हवे

स्वॅब घेतल्यानंतर क्वारंटाईन राहण्यास सांगितले जाते. हा कर्मचारी राहिला की नाही, त्याने त्यानंतरही ड्यूटी केली का? हे पोलीसच सांगू शकतील. तसेच परळीत रुग्णवाहिका खराब असल्याने सिरसाळा येथील मागवण्यात आली. त्यामुळे उशिर झाला. उपजिल्हा रुग्णालयातून तपासणी करून त्याला अंबाजोगाई कोवीड रुग्णालयात हलविले आहे. - डॉ.लक्ष्मण मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, परळी

चौकशी केली जाईल.

परळीचा कर्मचारी कोरोना बाधित असल्याची माहिती रात्री उशीरा मला कळाली होती.झाल्या प्रकाराबाबत चौकशी केली जाईल - राहुल धस, उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबाजोगाई