आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक कारवाई:बनावट दारू तयार करून जालना, नगर जिल्ह्यांत केली जातेय विक्री

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रसायनयुक्त बनावट दारू तयार करून त्यावर देशी दारूचे लेबल लावून ती खरी दारू असल्याचे भासवून त्याची बीडसह जालना आणि नगर जिल्ह्यात विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला. बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकून याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईत २ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिदोड शिवारात बनावट दारू तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून बुधवारी रात्री सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक भगतसिंह दुल्लत यांनी कर्मचाऱ्यांसह शिदाेड शिवारात छापा टाकला. या वेळी आरोग्याला हानिकारक ठरेल अशा प्रकारे रसायन वापरून बनावट दारू तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अशोक सोनाजी जाधव (रा. गांधीनगर, बीड) याला ताब्यात घेतले. विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या, दारू तयार करण्यासाठीचे रसायन, पॅकिंगचे मशीन, विविध कंपन्यांचे बॉक्स आणि स्टिकर, बाटल्या असा एकूण २ लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चोरी सोडून आला दारूच्या धंद्यात : या कारवाईत पकडण्यात आलेला आरोपी अशोक सोनाजी जाधव याच्यावर यापूर्वी चोरी, जबरी चोरीचे गुन्हे नोंद आहेत. चोरी सोडून तो काही महिन्यांपासून दारूच्या व्यवसायात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात तो घटनास्थळी पकडला गेला आहे.

ग्रामीण हद्दीत पुन्हा कारखाना
बीड ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर काही महिन्यांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. कुर्ला शिवारात ही कारवाई झाली होती. त्यानंतर आता पुन्हा िशदोड शिवारात बनावट दारूचा कारखाना आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळते, ग्रामीण ठाण्याला कशी मिळत नाही, हा प्रश्न आहे.

जालना, नगर कनेक्शन
या कारखान्यात रसायनयुक्त दारू तयार केली जात होती. ही दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे मृत्यूही होऊ शकतो. मात्र, ही दारू खरी असल्याचे भासवून विविध कंपन्यांच्या नावे देशी दारू म्हणून पॅकिंग करून विक्री केली जात होती. बीडसह शेजारच्या जालना, नगर जिल्ह्यातही पुरवठा केला जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

साखळी शोधण्याचे आव्हान
दरम्यान, या कारवाईत पोलिसांना कारखान्यावर एकच जण आढळून आला असून यातील भागीदार कोण, मास्टरमाइंड कोण, किती जणांचा यात सहभाग होता, किती कामगार दारू बनावण्याचे काम करत होते. महिनाभरापासून या ठिकाणी हा गोरखधंदा सुरू होता. यातील साखळी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

बातम्या आणखी आहेत...