आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:धारूर-आडस रस्त्याची दैना फिटेना; खड्डे बुजवण्यासाठी सर्रास मातीचा वापर

धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर-आडस मार्गे अंबाजोगाई या रस्त्याची मागील १५ वर्षांपासून दयनीय अवस्था झालेली आहे. यात अंबाजोगाई ते आडसपर्यंत रस्ता डांबरीकरणासह पूर्ण झाला आहे. परंतु आडस ते धारूर यादरम्यान जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. वेळोवेळी निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याचे दर्जेदार काम अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही. सध्या खड्डे बुजवण्याचे काम सुरू असले तरी गुत्तेदार खड्डे भरत असताना खडीबरोबर मातीचा वापर करत असल्याने हा रस्ता किती दिवस टिकेल, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

धारूर येथून आडसमार्गे अंबाजोगाईकडे जाणारा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. अंबाजोगाई आणि लातूर येथे रुग्ण तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता उपयुक्त म्हणून ओळखला जातो. या रस्त्याचे काम पंधरा वर्षांपूर्वी झालेले आहे. पंधरा वर्षांत हा रस्ता नव्याने करणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत या रस्त्याकडे प्रशासनाने डोळेझाक केलेली दिसून येते. यातच एक वर्षापूर्वी अंबाजोगाई ते आडसपर्यंतचा रस्ता डांबरीकरणासह पूर्ण झालेला दिसून येत असला, तरी आडस ते धारूर या माजलगाव मतदारसंघात मोडणाऱ्या या १३ किमी रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. या रस्त्यात जागोजागी खड्डे पडलेले आहेत. आडस - धारूर रस्ता खड्डेमुक्त करण्यात यावा, यासाठी वेळोवेळी निवेदनही दिलेली आहेत. परंतु या रस्त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

यातच सर्व स्तरातून वाढत असलेला दबाव लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे टेंडर काढलेले आहे. परंतु रस्त्याचे काम करत असणारा गुत्तेदार खड्डे बुजवण्यासाठी खडीबरोबर अक्षरशः मातीचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे हा रस्ता दर्जेदार होऊच शकणार नाही. लाखो रुपयांचे टेंडर काढलेले असतानाही खड्डे अवघ्या काही दिवसांत पुन्हा उघडे पडतील. खडीबरोबर माती मिसळून रस्ता दुरुस्त केला जात असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे. दरम्यान, रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याकडे प्रशासना लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

अधिकाऱ्यांची डोळेझाक
धारूर-आडस रस्त्यावर मागील सहा महिन्यांपासून मोठे खड्डे पडल्यामुळे येथील वाहतूक केजमार्गे मोठ्या प्रमाणात होत आहे. अधिकारी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असले तरी त्याकडे जाणीवपूर्वक गुत्तेदाराचे हित जोपासण्यासाठी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. यापुढे आता जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे.

कामात अनियमितता आढळल्यास चौकशी
धारूर-आडस रस्त्यादरम्यानचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. हे काम दर्जेदार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कामात अनियमितता होत असेल तर त्याची चौकशी केली जाईल. धारूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामावर हजर राहण्याच्या सूचना देऊ. - संजय मुंडे, कार्यकारी अभियंता, अंबाजोगाई

बातम्या आणखी आहेत...