आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाज मेळावा:दशनाम गोसावी समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यावर अधिक भर देणार

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे आश्वासन

हिंदू धर्माच्या प्रचार व प्रसाराबरोबरच देवी-देवतांची सेवा करणारा दशनाम गोसावी समाज बीड शहर व जिल्ह्यात संख्येने अल्प असला तरी समाजाच्या उतरंडीत त्यांचे मोठे योगदान आहे. अनादिकाळापासून ईश्वर साधनेचे कार्य या समाजाने केली आहेत. आगामी काळात या समाजासाठी स्मशानभूमी, सांस्कृतिक सभागृहासह इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण काम करणार असून सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिले.

बीड येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात रविवारी (३ एप्रिल) दशनाम गोसावी परिषद बीडच्या वतीने राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. पहिल्या राज्यस्तरीय मेळाव्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला त्याप्रसंगी डॉ. क्षीरसागर बोलत होते. महादेव महाराज चाकरवाडीकर, संतोष गिरी महाराज, महंत चिंतामण महाराज, महंत भरत महाराज भिंगोलीकर, माजी आमदार उषा दराडे, मराठवाडा अध्यक्ष संपत पुरी, मराठवाडा संघटक बालासाहेब गिरी, संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र बन, जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरी, भारत पुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर म्हणाले, दशनाम गोसावी समाज हा अतिशय शांत, मनमिळाऊ आणि सेवावृत्ती आहे. भेटलेल्या प्रत्येकाला ‘नमो नारायण’ म्हणून आदराने बोलणाऱ्या या समाजाने अनादिकाळापासून ग्रामीण भागातील देवळे, मोठे मंदिर आणि देवांची सेवा केलेली आहे. दशनाम गोसावी समाजाच्या रक्तातच सेवाभाव आहे. बीडचा नगराध्यक्ष म्हणून काम करताना प्रत्येक लहान-मोठ्या समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. येत्या सहा महिन्यांत गोसावी समाजाला हक्काच्या स्मशानभूमीसाठी जागा देणार आहे. सामाजिक सभागृहाचा प्रश्‍नदेखील सोडवणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी पंडित गोसावी, डी. के. गोसावी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरींनी केले. समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडत गोसावी समाजाला मागासलेपण दूर करण्यासाठी आता शिक्षणाची कास धरावी लागेल. समाजाचे संघटन आणखी मजबूत करावे लागेल. तरच गावोगावचे स्मशानभूमीचे प्रश्‍न, इनामी जमिनीचे प्रश्‍न, हक्काचे सामाजिक सभागृह हे प्रश्‍न मार्गी लागतील, असे ओमप्रकाश गिरी म्हणाले. राज्यस्तरीय मेळाव्यात समाजात चांगले काम करून नावलौकिक मिळवणाऱ्यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव केला. मेळाव्याच्या पूर्वसंध्येला समाजातील शेकडो मुलांवर बीजहोम महायज्ञ संस्कार करण्यात आले.

समाजरत्न पुरस्काराने यांचा झाला गौरव
दशनाम गोसावी समाजाच्या बीड येथील राज्यस्तरीय मेळाव्यात समाजातील मान्यवरांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. वीरपीता मुन्नागीर गोसावी, पंडित गोसावी, जगदेव गिरी, रमा गिरी, सुनील गोसावी, राहुल गिरी, कैलास भारती, मनोहर गिरी, मीना बन, दत्ता महाराज गिरी, सुनील गोसावी आदींचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

खासदार प्रीतम मुंडेंचा शुभेच्छा संदेश
भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांना नियोजित कार्यक्रमामुळे दशनाम गोसावी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यास उपस्थित राहता आले नाही. त्यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. गोसावी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी गरज पडेल तिथे योगदान देऊ असे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले.

बातम्या आणखी आहेत...