आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थ संतप्त:मृतदेह ठाण्यात; खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणावर अंत्यसंस्कार

गेवराई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती कारणावरून दोन गटांत सहा दिवसांपूर्वी हाणामारी झाल्यानंतर यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला मारहाण केलेल्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी गेवराई तालुक्यातील तळण्याचीवाडी येथील संतप्त ग्रामस्थ, तरुणांनी औरंगाबादहून गेवराईला आल्यानंतर थेट गेवराई पोलिस ठाण्याच्या आवारातच तरुणाचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका नेली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून मंगळवारी रात्री उशिरा पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर गावातील लोकांनी रुग्णवाहिका गावाकडे नेत तरुणाच्या पार्थिवावर बुधवारी पहाटे अंत्यसंस्कार केले. नामदेव ढेंबरे (३२, रा. तळण्याचीवाडी, ता. गेवराई ) असे मृताचे नाव आहे.

गेवराई तालुक्यातील उमापूर रोडवरील तळण्याचीवाडी येथे दोन गटांत घरगुती कारणातून शुक्रवारी (१२ ऑगस्ट) हाणामारी झाली होती. या हाणामारीत नामदेव ढेंबरे (३२) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे तरुणावर औरंगाबाद येथे उपचार करण्यात येत होते. दरम्यान, उपचारादरम्यान १६ ऑगस्ट रोजी दुपारी तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला मारहाण केलेल्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तळण्याचीवाडी गावातील शेकडो तरुणांनी नामदेव ढेंबरे या तरुणाच्या मृतदेहासह रुग्णवाहिका थेट गेवराई पोलिस ठाण्यात आणली. त्यामुळे गेवराई पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील पोलिस उपनिरीक्षक जंजाळ व एपीआय तुकाराम बोडखे यांनी आलेल्या तरुणांची समजूत काढली. तरुणांनी या प्रकरणात गेवराई ठाण्यात वकिलांना पाचारण केले. पोलिसांनी सर्व बाबी तपासून मंगळवारी रात्री उशिरा गेवराई पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर बुधवारी पहाटे तीन वाजता तळण्याचीवाडी येथील स्मशानभूमीत तरुणाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी एपीआय तुकाराम बोडखे पुढील तपास करत आहेत.

नामदेवच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर
तळण्याचीवाडी येथे दोन गटांत घरगुती कारणावरून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी होऊन मृत झालेला तरुण नामदेव ढेंबरे हा शेतकरी होता. त्याच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर पडले असून त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ आणि तीन वर्षांचा मुलगा आहे.

आरोपींना लवकरच अटक करू
या गुन्ह्यातील पाचही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेवराई पोलिस ठाण्याची दोन पथके रात्री उशिरा रवाना केली आहेत. दरम्यान, बुधवारी उशिरापर्यंत आरोपीचा शोध लागला नव्हता.
-तुकाराम बोडखे, तपास अधिकारी, गेवराई

पोलिसांकडून पंचनामा
गेवराई तालुक्यातील तळण्याचीवाडी येथील नामदेव ढेंबरे (३२) याच्या मृत्युप्रकरणी बुधवारी सकाळी गेवराई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या प्रकरणात एकही आरोपी ताब्यात घेण्यात आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...