आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक:आज ठरवा गावकारभारी

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसाठी आज रविवार रोजी २ हजार केंद्रांवरुन मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. जिल्ह्यातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील असलेल्या १२० गावांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून या गावांसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त असेल. तर, व्हिडीओ शूटिंगही केली जाणार आहे. १२ हजार कर्मचारी एकूण मतदानाच्या प्रक्रियेत आहेत तर, ३ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या साडेपाच हजार सदस्यांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. जिल्ह्यात ४७ सरपंच बिनविरोध निवडूण आलेले आहेत तर, सुमारे साडेसहाशे सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. दरम्यान, आज रविवारी मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. दहा दिवसांच्या प्रचाराच्या काळात रात्रीचा दिवस करुन उमेदवारांनी प्रचार केला आहे. त्यांच्या परीक्षेचा आजचा दिवस असणार आहे. प्रशासनानेही मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात २ हजार केंद्रांवरुन मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असे ३७९ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तर, मतदान केंद्रांवर १२ हजार २६० कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. शनिवारी मत पेट्या घेऊन कर्मचाऱ्यांना रवाना केले गेले.

मतदान प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनानेही तयारी केली असून दीड हजार उपद्रवी लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात १८गावातील ६९ मतदान केंद्र अतिसंवेदनशील तर, १०२ गावांमधील २८४ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या १२० गावांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ शुटींग केले जाणार आहे

झोन पेट्रोिलंगही करणार
जिल्ह्यात २ अपर पोलिस अधीक्षक, ८ पोलिस उपअधीक्षक, १७ पोलिस निरीक्षक, १७३ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, १ हजार ५५९ पोलिस अंमलदार, १ हजार ९४ होमगार्डसह राज्य राखीव पोलिस दलाच्या २ तुकड्या आणि आरसीपीच्या ७ तुकड्या तैनात आहेत. झोन पेट्रोलिंगही केली जाणार आहे.

शांततेत प्रकिया हाेणार
जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडेल अशा दृष्टीने नियोजन केले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी दक्षता घेतली जात आहे. अतिसंवेदनशील आणि संवेदनशील केंद्रांवर वॉच आहे. उपद्रवींची गय केली जाणार नाही. नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड

संवेदनशील गावे
बीड, वडवणी तालुक्यात प्रत्येकी ९, आष्टी तालुक्यात ३०, पाटोदा व शिरुरमध्ये प्रत्येकी ५, माजलगाव धारुर व अंबाजाेगाईत प्रत्येकी ८, गेवराईत ०६, केजमध्ये १२ तर, परळीत ११ गावे संवेदनशील आहेत.

बातम्या आणखी आहेत...