आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:वाळू ठेका रद्दची मागणी; आमदार पवारांसह ग्रामस्थ 6 तास पाण्यात

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नियमबाह्य वाळूचा ठेका रद्द करण्यासाठी गंगावाडी (ता. गेवराई) येथील ग्रामस्थांसह भाजप आमदार अॅड. लक्ष्मण पवार यांनी शनिवारी (४ जून) गोदावरी नदीपात्रातील पाण्यात सहा तास आंदोलन केले. दरम्यान, तहसीलदारांनी गंगावाडीत धाव घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, ग्रामस्थ आंदोलनावर ठाम राहिले.

वाळूचा ठेका रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यामुळे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा गंगावाडीत आंदोलनस्थळी पोहोचले. वाळू ठेक्याची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची २४ तासांत चौकशी समिती नियुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. हा वाळू ठेका सुरू ठेवायचा की बंद करायचा याचा निर्णय सोमवारी जिल्हाधिकारी घेणार असून दुपारी तीन वाजता आमदार लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

गंगावाडीतील वाळू घाटाला महसूल प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. परंतु वाळू घाट ज्या ठिकाणी मंजूर झाला त्याऐवजी दुसऱ्या ठिकाणाहून वाळूमाफियांकडून वाळूचा उपसा सुरू आहे. हा वाळूचा ठेका मिळवण्यासाठी बनावट ठरावावर सरपंचाच्या स्वाक्षऱ्या असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत दोन दिवसांपूर्वीच आमदार पवारांनी मध्यस्ती करत ग्रामस्थांचे उपोषण सोडवले होते. परंतु, दोन दिवसांत महसूल प्रशासनाने कारवाई केली नसल्याने शनिवारी सकाळी ११ वाजता ग्रामस्थांसह आ. पवारांनी गंगावाडी गोदापात्रात आंदोलन सुरू केलेहोते. जिल्हाधिकारी शर्मा शनिवारी सायं. साडेपाच वाजता आंदोलकांना भेटण्यासाठी गंगावाडीत पोहोचलेहोते.

वाळू ठेका सर्व्हे नबंर ३२९ चा, उत्खनन सर्व्हे नंबर ३५४ मधून
गंगावाडीत वाळूचे दोन-दोन टेंडर होते, त्यात सर्व्हे नबंर २८३, २८४, ३२९ मध्ये वाळू उत्खनन करण्यासाठी ताबा दिला होता. परंतु, वाळूमाफिया सर्व्हे नंबर ३५४ मधून बेकायदा वाळू उत्खनन करत होते. याची तक्रार तहसीलदारांकडे केलीहोती.

सोमवारी तीन वाजता बैठक
गंगावाडी वाळू घाटप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत करून ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशित केले. येत्या सोमवारी दुपारी ३ वाजता बैठक आयोजित केली. या बैठकीस आमदार पवार, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित राहतील.

गेवराई तालुक्यात एकूण किती आहेत वाळू घाट?
गुळज, राक्षसभुवन, राजापूर, काठोडा, सुरळेगाव, खामगाव, गुंतेगाव, हिंगणगाव, राहेरी, बोरगाव थडी, भोगलगाव, पांढरी, मिरगाव, तपेनिमगाव, ढालेगाव, रामपुरी, पाथरवाला बु., पाथरवाला खुर्द, आगर नांदूर, गोंदी, कट चिंचोली असे गोदावरी नदी परिसरात एकूण ३२ वाळू घाट आहेत.

जिल्ह्यात सध्या किती वाळू घाटांचा लिलाव झाला आहे?
गेवराई तालुक्यातील गुंतेगाव, म्हाळस पिंपळगाव, सावळेश्वर, सावरगाव, तपे निमगाव, संगम जळगाव अशा ६ वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत.

गेवराईमध्ये वाळूचे दर प्रति ब्रास ४ हजार रुपये का झाले?
माफियांकडून वाळूची साठेबाजी केली जात आहे. शासकीय दराने वाळू न विकता चढ्या भावाने विक्री होत आहे. गेवराई तालुक्यात वाळूचे ६ टेंडर सुरू असून वाळूचे दर चार हजार रुपये प्रति ब्रास आहेत.

बातम्या आणखी आहेत...