आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड विषयक निर्बंधांमुळे मागील २ वर्षांपासून खंड पडलेली ‘ज्ञानोबा-तुकोबांची’ पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात देहू-आळंदीवरून पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या अभिनव संकल्पनेतून यंदा पालखी सोहळयात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाबरोबरच संविधानाचाही गजर होणार आहे. पालखी प्रस्थानाच्या वेळी आळंदी येथून पालखी सोबतच संविधान दिंडी आयोजित करण्यात आली असून दि. २१ जून रोजी आळंदी येथून निघणारी ही संविधान दिंडी पालखी मार्गावर सर्वत्र संवैधानिक मूल्यांचा गजर भजन-कीर्तन, अभंग म्हणत १० जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
२१ जून रोजी आळंदी येथील चऱ्होली फाटा येथे दुपारी ३ वाजता या दिंडीचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान होईल. या दिवशी सायंकाळी संविधान जलसा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २२ रोजी संविधान दिंडी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे येथे मुक्कामास येईल. या दरम्यान राज्यातील नामवंत विचारवंत, सांस्कृतिक कलावंत, भजनी मंडळ आदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेतले जातील. गुरुवारी(२३) पालखी मुक्काम स्थळाजवळ नाना पेठ येथे संविधान जलसा हा मुख्य कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास मंत्री धनंजय मुंडे, अभिनेता तथा विचारवंत नसिरुद्दीन शहा, नीलेश नवलखा, शबाना आझमी, नागराज मंजुळे, रत्नाकर पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिय आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. २४ जून रोजी पासून ते दि. १० जुलै पर्यंत पालखी सोहळ्यामध्ये संविधान दिंडी संमिलित होऊन, त्यामधून ठिकठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन आदी उपक्रम सुरू राहतील.
त्याचबरोबर ठिकठिकाणी संविधान उद्देशिका वाचन व वाटप, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबाबत जागृती, संविधानातील हक्क व कर्तव्ये तसेच विविध परिशिष्ट, कलमे आदींचे डिजिटल सादरीकरण, ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून लोकसंवाद, वृक्षारोपण, योजनांच्या माहितीच्या पत्रिकांचे वाटप उपक्रम राबवले जाणार आहेत. २४ जून ते १० जुलै पालखी सोहळा व संविधान दिंडी पालखीच्या ठरलेल्या मुक्काम मार्गावर मार्गक्रमण करत जाईल. पालखीदरम्यान दिंडीत व मुक्कामाच्या ठिकाणी उपक्रम राबवण्याचे नियोजन बार्टीमार्फत करण्यात आले असून या संविधान दिंडीचा १० जुलै रोजी पंढरपूर येथे समारोप होणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.
‘आजच्या पिढीला अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी’
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी लाखो भाविक वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देहू-आळंदी येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. देशाचे संविधानही आपल्या संतांनी दिलेल्या समता, बंधुभाव व सामाजिक न्याय या मूलतत्वांवर आधारित आहे. आजच्या पिढीला अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने लाखो भाविकांच्या “ज्ञानोबा माउली तुकाराम' जयघोषाच्या निनादात निघणाऱ्या पालखी सोहळ्यात संविधान दिंडी आयोजित करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.