आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झटपट निर्णय:मराठवाडा दौऱ्यात आढावा, पाहणी अन् दादांचा फैसला ‘ऑन द स्पॉट’; राजेश टोपे म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवणार

बीड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांची जालन्यात पाहणी, बीडमध्ये बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार आज मराठवाडा दौऱ्यावर होते. त्यांनी जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांना भेटी दिल्या. रुग्णवाहिका खरेदीसाठी तांत्रिक मान्यतेचा अधिकार जिल्हास्तरावर देण्याचा निर्णय बैठकीत घेऊन त्यांनी झटपट कामे मार्गी लावण्यासाठी त्यांची हतोटी पुन्हा एकदा सिद्ध केली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या आढावा बैठकीत यासंबंधीचा विषय समोर येताच त्यांनी थेट आरोग्य आयुक्त रामस्वामी यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा करून यासंबंधीचे निर्देश दिले. तसेच बीड शहरातील अस्वच्छतेबद्दल मुख्याधिकाऱ्यांची झाडाझडतीही घेतली. जालन्यात जिल्ह्यात अंबड तालुक्यातील महाकाळा येथे होणाऱ्या ऊस बेणे संशोधन केंद्रासाठीच्या जागेची पाहणीही त्यांनी केली.

अजित पवार यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे होते. ते म्हणाले की, कोरोना रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक खासगी कोविड रुग्णालयात शासनातर्फे ऑडिटरची नेमणूक केली आहे. येत्या एक ते दीड महिन्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.

उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर सौम्य लाठीमार
आढावा बैठकीनंतर अजित पवार व राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा बाहेर पडला. नगर रोडवरील सामाजिक न्याय भवनासमोरून उस्मानाबादकडे जाण्याच्या तयारीत असतानाच शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी करत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी समोर येऊन हा ताफा अडवला. हे पाहून पोलिसांनी धाव घेत जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला आहे. कोरोना संकटात कंत्राटी आरोग्य कर्मचारी म्हणून नेमणूक दिली गेली. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच अशा कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याने शुक्रवारी पवार यांच्यापुढे कैफियत मांडण्यासाठी आरोग्य कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आले होते.

अंबडच्या महाकाळा येथे ऊस बेणे संशोधन केंद्राच्या जागेची केली पाहणी
वडीगोद्री | मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस बेणे संशोधन केंद्र तसेच शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र व कोईम्बतूरवरून विविध प्रकारच्या उसाच्या नवीन जातीचे बेणे प्लॉट उभारण्यात येणार आहे. यामुळे मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या उत्पादन वाढीसाठी चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन पवार यांनी केले. अंबड तालुक्यातील महाकाळा येथे होणाऱ्या ऊस बेणे संशोधन केंद्रासाठी व्हीएसआय अर्थात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी १२७ एकर जमीन अंबड तालुक्यातील महाकाळा येथे संपादित केली आहे. त्या उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठीच्या जमिनीची पाहणी करण्यासह आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री येथे आले होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे चेअरमन बी. बी. ठोंबरे, समर्थ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तम पवार आदींची उपस्थिती होती.

माजी मंत्री पंकजा मुंडेंची टीका
हा सगळा प्रकार संतापजनक आहे. ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले. स्वत:च्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आले आहेत तर जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अजित पवारांची भेट घडवून आणणे तिथल्या स्थानिक नेत्यांचे काम होते. त्यांनी ठरवले असते तर गोंधळ झाला नसता. पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली.

दुभाजकावर किती माती साचली आहे? तू करतो तरी काय ?
अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांची शहरातील अस्वच्छतेवरून चांगलीच खरडपट्टी काढली. तुला प्रोटोकॉल कळतो का रे, बीड शहरात सगळी अस्वच्छता आहे, दुभाजकावर किती धूळ अन घाण, माती साचली आहे, तू करतो तरी काय, दोन दिवसांत स्वच्छता करा, या शब्दातच पवारांनी मुख्याधिकाऱ्यांना झापले.

बीड जिल्ह्यात लसी उपलब्ध करण्याचे दिले आश्वासन
जिल्ह्यात दहा लाख लोकसंख्येमागे एकूण दोन लाख १८ हजार ५५८ तपासण्या होत आहेत. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६.४३ टक्के असून बीड जिल्ह्याचा १५.२९% आहे. जिल्ह्यातील लसीकरण शासनाच्या सूचनांनुसार दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांसाठी सुरू आहे. जिल्ह्यास लसी उपलब्ध होतील असे नियोजन केले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.