आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केज तहसील कार्यालयात थरार:शेतीच्या वादातून महिला नायब तहसीलदारावर भावाकडून कोयत्याने हल्ला

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ल्यात जखमी नायब तहसीलदार आशा वाघ यांना रुग्णालयात घेऊन जाताना कर्मचारी. (इन्सेट) आरोपी मधुकर वाघ. - Divya Marathi
हल्ल्यात जखमी नायब तहसीलदार आशा वाघ यांना रुग्णालयात घेऊन जाताना कर्मचारी. (इन्सेट) आरोपी मधुकर वाघ.

शेतीच्या वादातून केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर त्यांच्या मोठ्या भावाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. केज तहसील कार्यालयात वाघ यांच्या कक्षात हा थरार घडला. डोक्यात पाच वार केल्याने वाघ गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी लातूरच्या रुग्णालयात दाखल केले आहे. हल्लेखोर भावाला कर्मचाऱ्यांनी कोंडून ठेवून पोलिसांच्या हवाली केले.

भाऊ कोयता घेऊन कार्यालयात घुसला

केज तहसील कार्यालयात महसूल क्र. २ मध्ये आशा दयाराम वाघ या नायब तहसीलदार म्हणून १० वर्षांपासून कार्यरत आहेत. दोनडिगर (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील त्यांचा भाऊ मधुकर दयाराम वाघ व त्यांच्यात शेतीचा वाद सुरू होता. सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास नायब तहसीलदार आशा वाघ या तहसील कार्यालयातील आस्थापना विभागात कामकाज करीत बसल्या होत्या. याच वेळी त्यांचा भाऊ मधुकर वाघ याने तोंडाला रुमाल गुंडाळून येत पिशवीतून कोयता काढून अचानकपणे आशा वाघ यांच्या डोक्यात व हातावर कोयत्याने सपासप वार करीत जीवघेणा हल्ला केला.

महसूलच्या कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान

अचानकपणे झालेल्या हल्ल्याने वाघ यांनी रक्तबंबाळ अवस्थेत आरडाओरडा करीत जीव वाचविण्यासाठी शेजारी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात धावत जाऊन बसल्या. या प्रकारामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. महसूलच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान साधून त्या हल्लेखोर मधुकर वाघ यास एका रूममध्ये कोंडले.

सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार वैभव सारंग यांनी तहसील कार्यालयात दाखल होत मधुकर वाघ यास कोयत्यासह ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या आशा वाघ यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तेथून लातूरला हलवण्यात आले आहे.

यापूर्वी भावाने काढले होते मृत्यू प्रमाणपत्र

मधुकर वाघ याने काही महिन्यांपूर्वी चाळीसगाव नगरपालिकेतून आशा वाघ यांचे मृत्यू प्रमाणपत्र काढले होते. आशा वाघ या २००४ मध्येच मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नावाने बोगस प्रमाणपत्र वापरून त्यांनी एमपीएससीची व आता महसूल विभागाला फसवत असल्याची तक्रार थेट महसूल सचिव, महसूल उपायुक्त यांना केली होती. त्यावरून उपायुक्तांनी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

जबाब नोंदवण्यासाठी पोलिस रवाना

केज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे म्हणाले की, हल्ला करणाऱ्यास कोयत्यासह ताब्यात घेतले आहे. जखमी वाघ यांचा जबाब नोंदवण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठवले असून त्यानंतर गुन्हा नोंद होईल.

बातम्या आणखी आहेत...