आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू चोरी:घाटांचा लिलाव नसतानाही अवैध वाळूचा उपसा सुरूच

गेवराई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातून सध्याच्या परिस्थितीत अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल विभागाच्या वतीने मागील आठवड्यात काही कारवाया झाल्या आहेत मात्र तरीही अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात गोदावरीचे पात्र ७० कि.मी.असून ३२ वाळुघाट आहेत. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत नदी पात्रात जवळपास बहुतांश ठिकाणी दुथड्या पाणी असताना तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातील राक्षसभुवन, म्हाळस पिंपळगाव, सुरळेगावसह काही ठिकाणी नदीपात्रातील पाणी कमी झाले आहे. या ठिकाणाहून केनीच्या माध्यमातून वाळूचा अवैध वाळू उपसा करून हायवा, ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेकडो ब्राॅस वाळू वाहतूक केली जात आहे.

तालुक्यातील विविध ठिकाणी मागील आठवड्यात काही ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने चार कारवाया करण्यात आल्या आहेत. थातुरमातूर कारवाया करून आम्ही कारवाया करत असल्याचा बडेजाव केला जात आहे मात्र गेल्या काही दिवसापासून अवैध केनीच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी सर्रास वाळू उपसा करून हायवा आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून बिनदिक्कतपणे वाहतूक सुरु अाहे. याकडे महसूल विभागाची डोळेझाक होत आहे.

तालुक्यातील गोदावरीच्या पात्राच्या ठिकाणी राक्षसभुवन, सुरळेगाव, म्हाळस पिंपळगाव, सावरगाव नि., खामगाव, पांचाळेश्वर, संगम जळगाव, हिंगणगाव, गंगावाडी, आगर नांदर, गोंदी सह इतर ३२ वाळुघाट आहेत. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत कोठेही वाळूचा लिलाव झाला नाही तरीही उपसा सुरुच आहे.

नदीपात्रात पडले जीवघेणे खड्डे
तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातून विविध ठिकाणांहून होत असलेल्या अवैध वाळू उपशामुळे लगेच नदीपात्रात खड्डे पडणे, यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे, रस्ते खराब, पथकाच्या भितीने वाहने जोरात चालविणे यामुळे अपघात झालेले आहेत आणि होत आहेत.

शहरातील सीसीटीव्ही नावालाच
गेवराई शहरातील नवीन बसस्थानक, कोल्हेर रोड, ताकडगाव रोड सह आदि ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फक्त नावालाच असल्याचे दिसून येत आहेत. कारण या सर्व ठिकाणाहून ही वाहने शहराच्या मुख्य भागातून सुसाट वेगाने जात आहेत.

२५ ते ३० हजार रुपयांवर गेला दर
वाळूचा लिलाव नसल्याने चोरुन वाळू विक्री केली जात आहे. यामुळे वाळूचा दरही महागला आहे. एका हायवा साठी सुमारे २५ ते ३० हजार रुपये नागरिकांना माेजावे लागत आहेत. तालुक्यातील राजकीय स्थिती पाहता अनेक वाळू माफिया हे राजकीय पदाधिकारी असल्याने वरदहस्त मिळतो.

बातम्या आणखी आहेत...