आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडवा:देवी-देवतांना मानाच्या गाठ्या अर्पण करत भाविकांनी उभारली ‘नवसंकल्पांची गुढी’

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रभू वैद्यनाथाच्या स्पर्श दर्शनास सुरुवात, अंबाजोगाईत थेट गाभाऱ्यातून योगेश्वरीचे दर्शन; गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी अर्पण केल्या मानाच्या गाठ्या

अंबाजोगाई : भाविकांनी रांगेत राहून घेतले योगेश्वरीचे दर्शन
गुढीपाडव्यानिमित्त अंबाजोगाईतील योगेश्वरी देवीस शनिवारी पारंपरिक अलंकार परिधान केले. मंदिराच्या सभामंडपात गुढी उभी केली होती. मराठी नववर्षाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी अभिषेक व आरती घेऊन नैवेद्य दाखवला गेला. या वेळी भाविकांनी देवीला खारीक-खोबऱ्याऱ्या गाठ्या अर्पण केल्या. दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे योगेश्वरीच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी निर्बंध घालण्यात आले होते. शनिवारी हे निर्बंध उठवल्याने भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता आले. अन्नदानही सुरू केल्याची माहिती देवल कमिटीने दिली.

परळी : प्रभू वैद्यनाथाच्या स्पर्श दर्शनास सुरुवात
मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनपासून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथांचे स्पर्श दर्शन बंद होते. शनिवारी गुढीपाडव्यापासून प्रभू वैद्यनाथांच्या स्पर्श दर्शनास सुरुवात झाली. दुपारी ३ वाजता वैद्यनाथांची भस्मपूजा करून अलंकार चढवले. सायंकाळी ५ वाजता ध्वजाचे पूजन करून मंदिराच्या शिखरावर ध्वज चढवला. यानंतर भाविकांना शेरणीच्या प्रसादाचे वाटप केल्याचे वैद्यनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.

बीड : लिंबागणेश येथील गणपतीलाही गाठी अर्पण
लिंबागणेश येथील भालचंद्र गणपती मंदिरात शनिवारी अभिषेक, महापूजा, महानैवेद्य हे कार्यक्रम पार पडले. सकाळी भालचंद्राला पोशाख चढवला. संध्याकाळी सव्वासात वाजता महाआरती केली, तर नामलगावच्या आशापूरक गणपती मंदिरात सकाळी ६ वाजता महापूजा केल्यानंतर महापूजा, नैवेद्य दाखवला. भाविकांनी ५ मानाच्या गाठ्या अर्पण केल्या. दुपारी दीड वाजता संवत्सराचे वाचन केले. माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर गणपती, राक्षसभुवन येथील विज्ञानेश्वर गणपती व नवगण राजुरीतील मंगलमूर्ती गणपती मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले.

बातम्या आणखी आहेत...