आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाजीर हो....:विजयी मिरवणुकीतील वादाच्या प्रकरणात मंत्री मुंडे न्यायालयात, 14 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात आरोप निश्चित

धारूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौदा वर्षांपूर्वी तेलगाव येथील पंचायत समिती सदस्याच्या विजयी मिरवणुकीत वाद झाल्यानंतर वाद मिटवण्यासाठी आलेले धनंजय मुंडे यांच्यासह २४ जणांवर दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सोमवारी धारूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात स्वत:हून हजर झाले. सोमवारी आरोप निश्चित झाला असून आता १८ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

तेलगाव पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत २००६ मध्ये भाजपचे दीपक मुंडे यांच्या आई विजयी झाल्या होत्या. यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत दोन गटात वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी त्या वेळी धनंजय मुंडे व दिंद्रुड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दीपक पवार हे तेलगाव येथे आले होते. परंतु या ठिकाणी एका पोलिस कॉन्स्टेबलला मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक दीपक पवार यांनी दिंद्रुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून २४ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात धनंजय मुंडे यांच्याही नावाचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले होते. याप्रकरणी धनंजय मुंडे हे स्वत:हून धारूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात दाखल झाले. दरम्यान, सोमवारी या प्रकरणात आरोपनिश्चिती झाली असून आता येत्या १८ जानेवारी २०२१ रोजी या प्रकरणात पुन्हा सुनावणी होणार आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या वतीने या प्रकरणाचे काम प्रसिद्ध विधिज्ञ ॲड.जे. बी. बडे हे पाहत आहेत.

न्यायप्रविष्ट प्रकरणास अखेर मिळाली गती
सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी खासदार, आमदार यांच्यावरील खटले वर्षभरात निकाली काढण्याचे निर्देश न्यायालयांना दिलेले असून या निर्देशानुसार तेलगावच्या प्रकरणात आरोप असलेले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे सोमवारी स्वतःहून धारूर न्यायालयात हजर झाले. या न्यायप्रविष्ट प्रकरणास आजपासून गती येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्षभराच्या आत या प्रकरणावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser