आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:राष्ट्र केंद्रस्थानी ठेवून पत्रकारिता करत अपप्रवृत्तींवर धारूरकरांनी प्रहार केला; प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर यांचे प्रतिपादन

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय नोकरी सोडून केवळ राष्ट्र केंद्रस्थानी ठेवून स्व. दिलीप धारूरकर यांनी पत्रकारिता केली. त्यांनी चुकीच्या प्रवृत्तीवर ‘थेट प्रहार’ या शिर्षकातून लिखाण केले. तसेच संपादक असतानाही त्यांनी अनेक लेखक-साहित्यिकांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या आग्रहातून मी ज्या मालिका लिहिल्या त्यातूनच माझे कॉलेज कॅम्पस नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. पुढे ते महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त झाले. त्या मोठ्या पदावरून त्यांनी संवेदनशीलपणे गंभीर निर्णय घेऊन शासन लोकहिताचे मूल्य समाजात रुजवली, अशा शब्दामध्ये लेखिका तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

राज्याचे माजी माहिती आयुक्त, संपादक, विचारवंत, लेखक स्व.दिलीप धारूरकर यांचे नुकतेच निधन झाले. बीड शहरातील दीनदयाल शोध संस्थान सभागृह येथे बुधवारी (ता.२४ ऑगस्ट)श्रध्दांजली सभा घेण्यात आली. याप्रसंगी डॉ.क्षीरसागर बोलत होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीड शहर संघचालक डॉ.अनिल बारकुल, पत्रकार उमेश काळे, दिलीप खिस्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.क्षीरसागर म्हणाल्या, स्व. धारुरकर यांनी पत्रकारिता ही स्वत:ला प्रसिध्दी मिळवण्यासाठी कधीच केली नाही तसेच त्यांचे कोणतेही लिखाण हे भडक स्वरुपाचे नव्हते. विशेषकरुन त्यांनी त्यांच्या लेखणीतून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. शासन, लोकहिताचे निर्णय त्याचबरोबर चुकीच्या प्रवृत्तीवर प्रहार केला आहे.

‘शोर करते है कुछ लोग, सुरखीयो मे आने के लिए, हमारी खामोशी भी एक नया अखबार है” अशा पध्दतीचे त्यांच्या लिखाणाबद्दल डॉ. क्षीरसागर यांनी भावना व्यक्त केल्या. पत्रकार काळे म्हणाले, स्व.धारुरकर हे संघ परंपरा, हिंदुत्ववादी विचार जपणारे होते. या गुणांची जपवणूक आयुष्यभर केली परंतु पत्रकारिता, संपादक, माहिती आयुक्त यासह विविध पदावर असताना राष्ट्र केंद्रस्थानी ठेवून सर्व समाजाच्या विकासासाठी कार्य केले आहे. संपादक म्हणून काम करत असताना अनेक मोठे राजकिय व्यक्तींसोबत मैत्रीपुर्ण संबंध होते. मात्र, त्यांनी वेळप्रसंगी राजकीय प्रहार करताना चुकीला चूकच ही भूमीका प्रखरतेने मांडली. यासह अनेक जुन्या आठवणी, अनुभव याप्रसंगी काळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीड शहर संघचालक डॉ.अनिल बारकुल म्हणाले, स्व.धारुरकर यांनी पत्रकारितेची नैतीक मुल्य कशी असावीत हे भाषणांमधून सांगण्यापेक्षा स्वत:च्या जीवनामध्ये अंगीकृत करत कार्यातून नवीन पिढीच्या पत्रकारांपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यभरात विविध पदव्या प्राप्त केल्या त्याच बरोबर ते एक स्वयंसेवक होते असे सांगत डॉ.बारकुल यांनी इतर जुन्या आठवणी व्यक्त केल्या. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी, जगदीश पिंगळे, विकास उमापुरकर, सुदाम चव्हाण, दिनेश लिंबेकर यांनी भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक सुशील देशमुख यांनी केले तर सुत्रसंचालन रवी उबाळे यांनी केले तर सभेची सांगता एस.एन. कुलकर्णी यांनी शांतीमंत्र पठण करुन केली.

धारूरकरांचे मोठेपण शब्दांत मर्यादित करता येणार नाही
स्व. धारूरकर यांचे मोठेपण हे शब्दामध्ये मर्यादित करता येणारे नाही. त्यांनी पत्रकारिता, संपादक, महराष्ट्र राज्याजे माहिती आयुक्त विविध ठिकाणचे त्यांचे कार्य हे प्रभावशाली आणि त्या त्या क्षेत्रामधील नवीन येणाऱ्या पिढीसाठी प्रेणादायी तसेच कामासाठी मार्गदर्शक रचना होय, अशा भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीडचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. सुभाष जोशी यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...