आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असुविधा:धुनकवाड क्र. 2 ते उपळी फाटा रस्त्याची चाळणी, ग्रामस्थांच्या नशिबी खड्डेमय रस्ता

वडवणी10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील उपळी फाटा ते धुनकवाड या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. रस्ता अतिशय खराब झाला असून मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांसाठी अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी यांची रोज या मार्गावर गैरसोय होतेच. शिवाय दवाखान्यातून विविध शस्त्रक्रियेनंतर गावी आणल्या जाणाऱ्या रुग्णांचे टाकेही ढिले होण्यासारखी स्थिती या रस्त्याची झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर या मार्गावरून प्रवास करणे अधिकच कठीण होते. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे दहा वर्षांपासून या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागेना.

पावसाळ्याचे दिवस सुरू असून वडवणी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. वडवणी तालुक्यातील धुनकवाड क्रमांक दोन ते उपळी फाटा या रस्त्यावर तर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये सतत असल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही व अनेकदा या मार्गावर अपघात होत आहेत.

एक खड्डा टाळला की दुसऱ्या खड्ड्यात जाऊन गाडी आदळते. या रस्त्याने दररोज अनेक लहान-मोठी वाहने ये-जा करतात. धुनकवाड, डोंगरेवस्ती, उपळी परिसरातील शेतकरी शेतमाल वडवणी, माजलगाव येथे विक्रीसाठी याच मार्गाने नेतात. तसेच या रस्त्यालगत असलेली शेतकऱ्यांची मुले याच रस्त्याने शाळेत जातात. सदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी उपळी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. रात्री-अपरात्री येणाऱ्या वाहनांना खड्डे दिसत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत.

तालुक्यात अवकाळी पावसाने या रस्त्यांची बिकट अवस्था झाली असल्याने मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात मोठा त्रास होतो. रस्त्यावर पाणी जमा होते आहे. प्रवास करणे अवघड होते. गाडी स्लिप होणे आता नित्याचे झाले आहे. या प्रश्नाकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी दिला आहे.

दवाखान्यात जाण्याच्या वेळेला होतो त्रास
खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघात घडत आहेत. वाहने नादुरुस्त होत असून वाहनचालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दवाखान्याची वेळ आली तर केवळ रस्त्यामुळे अधिकचा वेळ लागतो. रुग्णालयात जाण्यास विलंब झाला तर एखादा रुग्ण दगावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
-अशोक डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य, उपळी/डोंगरेवस्ती

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांसह उपोषण करणार
उपळी फाटा ते डोंगरे वस्ती व धुनकवाड या रस्त्यावर पाच ते दहा वर्षांपासून खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य वाढले आहे. रात्री-अपरात्री येणाऱ्या वाहनांना खड्डे दिसत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यावर माणसाचा मृत्यू झाल्यावर जाग येईल का? काही जागेवरचे डांबरीकरण उखडून गेले असून हा कच्चा रस्ता झाला असल्याने पावसाळ्यात मोठा त्रास होत आहे. रस्त्यावर पाणी जमा होते. रस्त्याने जात असताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. संबंधित विभागाने दखल घेऊन रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन बेमुदत उपोषण करणार आहोत.
- धर्मराज डोंगरे, ग्रामस्थ, डोंगरे वस्ती, उपळी.