आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज वाटप:जिल्ह्यात खासगी बँकांचा हात आखडता, शेतकऱ्यांना केवळ 19 % कर्ज वाटप

अमोल मुळे | बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात खरिपाच्या पीक कर्ज वाटपात खासगी बँकांनी हात आखडता घेतल्याने अद्याप उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. ऑगस्टअखेर ७० टक्के कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६१ हजार ४८८ शेतकऱ्यांना १२४३ कोटी ७९ लाख रुपयांचे पीक कर्ज मिळाले. खासगी बँकांनी केवळ १९ टक्के कर्ज वाटप केले.

शेतकऱ्यांना ऊर्जितावस्था देण्यासाठी पीक कर्ज महत्त्वाचे माध्यम आहे. परंतु, बहुतांश खासगी बँका ऑगस्ट संपला तरी सकारात्मकता दाखवत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्याला या वर्षी १७६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, आतापर्यंत उद्दिष्टांपैकी १२४३ कोटी ७९ लाख रुपये पीक कर्ज वितरित केले. राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक आणि डीडीसीकडून चांगल्या प्रकारे पीक कर्ज वाटप होत असले तरी खासगी बँकांना अल्प प्रतिसाद मिळताेय. काही खासगी बँकांकडून एकाही शेतकऱ्याला पीक कर्ज दिले नसल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या अहवालातून समोर आले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून ५६ हजार ९३ शेतकऱ्यांना कर्ज : जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने या वर्षी पीक कर्ज वाटपात चांगली कामगिरी केली. ४०० कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना या बँकेने ५६ हजार ९३ शेतकऱ्यांना ४१७ कोटी ४८ लाखांचे पीक कर्ज वितरित केले. या बँकेची टक्केवारी १०४ वर गेली.

राष्ट्रीयीकृत बँकांचे ७३ % कर्ज
जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांना ६९९ कोटींच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले होते. बँकांनी ५३ हजार ५६९ शेतकऱ्यांना ५१७ कोटींचे पीक कर्ज वाटप केले. एकूण ७३ टक्के उद्दिष्टपूर्ती राष्ट्रीयीकृत बँकांनी केली आहे.

खासगी बँकांची कासवगती
जिल्ह्यात ७ खासगी बँकांच्या २० शाखा असून त्यांना एकूण २४१ कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, केवळ २०१८ शेतकऱ्यांना ४७.९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले. ही टक्केवारी १९.८८ टक्के आहे.

डीसीसीकडून ६० टक्के वाटप
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा ४२० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. ऑगस्टअखेर ४९ हजार ८०८ शेतकऱ्यांना २५२ कोटी ४१ लाखांचे कर्ज वाटप डीसीसीने केले असून ही टक्केवारी ६० इतकी आहे.

खासगी बँकांवर कारवाई करा
खासगी बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे, यासाठी आमदार, खासदार यांनी बँकांची बैठक घ्यावी. शिवाय, राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्याजाचा दरच खासगी बँकांनी लावावा, अधिकचा दर लावू नये. शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यास या बँकांविरोधात आंदोलन करू. - गंगाभिषण थावरे, शेतकरी संघर्ष समिती, बीड

बातम्या आणखी आहेत...