आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:​​​​​​​कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्याच्या पाठीशी - पवार; तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने सज्ज व्हावे - टोपे

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनासह खरीप हंगामाचा उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतला आढावा; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

राज्यात कोरोना नियंत्रणात येत अाहे. परंतु, बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण चिंताजनक असून ते नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासन ताकदीनिशी बीड जिल्हा प्रशासनाच्या पाठीशी अाहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्यासह सर्व यंत्रणांच्या साहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून त्या दृष्टीने तयारी करावी, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीत भाजप आमदार सुरेश धस यांनी कांद्यांच्या बियाण्याचे महागडे तीन बॉक्स उपमुख्यमंत्री पवारांना दाखवण्यासाठी आणले होते. जिल्ह्यात कांद्याच्या बियाण्यांची चढ्या भावाने विक्री केली जात असून शेतकऱ्यांची कशी लूट केली जाते याची माहिती आमदार धस यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

उपमुख्यमंत्री पवारांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाबाबत व जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे, जि. प. अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, भाजपचे आमदार सुरेश धस, सतीश चव्हाण, विक्रम काळे, संजय, दौंड, जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, सीईअाे अजित कुंभार, एसपी आर. राजा, कृषी विभागाचे विभागीय उपायुक्त अविनाश पाठक, आरोग्य उपसंचालक डाॅ. एकनाथ माले अादींची उपस्थिती हाेती.

या वेळी अजितदादा म्हणाले, माजलगावात उपजिल्हा रुग्णालय मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली आहे. तर आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, संपूर्ण राज्यासाठी ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन साठा असावा या दृष्टीने उपाययोजना करताना शासनाने यासाठी सवलती दिल्यात. मोठ्या खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजनची यंत्रणा सुसज्ज ठेवावी. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १४ केएल क्षमतेचा एक लिक्विड ऑक्सिजन टँक उपलब्ध करून लिक्विड ऑक्सिजन साठा सुरक्षित करावा, यामुळे रिकामे झालेले सिलिंडर हे ग्रामीण भागात वापरावेत, असे आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले. बैठकीसाठी जि.प.चे युद्धाजित पंडित, जयसिंह सोळंके, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, माजी आमदार सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, सुनील धांडे, उषा दराडे आदी उपस्थित होते.

पीक कर्ज वाटपासाठी बँकांना १५ जुलैची मुदत
महाबीजकडून उपलब्ध होणारे बियाणे मर्यादित आहे. परंतु, राज्य शासन इतर कंपन्यांचे बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहे. खतांची उपलब्धता पुरेशी अाहे. पीक कर्ज वाटपासाठी बँकांना १५ जुलै ही अंतिम मुदत देण्यात येत अाहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला याचा आढावा घ्यावा, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

काँटॅक्ट, ट्रेसिंग पद्धतीचा वापर करावा
जिल्ह्यातील मृत्युदर चिंताजनक अाहे. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर ७२ तासांत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी तपासण्या वाढवाव्यात, तपासण्या करताना शास्त्रीयदृष्ट्या अधिकृत ठरवलेली काँटॅक्ट, ट्रेसिंगची पद्धत वापरावी. यामुळे रुग्णांचे सहवासित, हाय-रिस्क, लो-रिस्क बाधित सापडण्यास मदत होईल. -राजेश टोपे, सार्वजनिक आराेग्य व कुटुंब कल्याण मंत्री.

तिसरी लाट आलीच तर यशस्वी मात करू
खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप व्यवस्थित होण्यासाठी अर्थमंत्री या नात्याने अजित पवार यांनी बँकांना आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत. जुन्या व नवीन अशा पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांला पीक कर्ज मिळावे, याचे योग्य नियोजन व्हावे. जिल्ह्यात जर दुर्दैवाने तिसरी लाट आलीच तर या लाटेच्या संकटातदेखील चांगले काम करून यशस्वी मुकाबला करू. -धनंजय मुंडे, पालकमंत्री, बीड.

धसांनी कांद्याचे महागडे बियाणे आणून उठवला आवाज
जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत अामदार सुरेश धस यांनी चढ्या भावाने विक्री होत असलेल्या कांद्याच्या बियाण्यांचे तीन बॉक्स उपमुख्यमंत्री पवारांना दाखवण्यासाठी आणले होते. हे बियाणे दाखवून त्यांनी आवाज उठवला. शेतकऱ्यांची कशा प्रकारे लूट केली जाते हे त्यांनी पत्रकारांशी बोलून माहिती दिली. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना आमदार धस म्हणाले, यंदा जिल्ह्यात कांद्याचे बियाणे चढ्या भावाने विक्री होत अाहे. मागील वर्षी पंचगंगा अाणि येलाेरा या कंपन्यांच्या बियाण्यांचा भाव २२०० रुपये हाेता. यंदा या बियाण्यांची किंमत २८०० रुपये झाली असून बाजारात ३२०० रुपयाने ते विकले जातेय. तर १२०० रुपये किमतीचे नयना सिडस् हे बियाणे २५०० रुपयाने विकले जात असून शेतकऱ्याचे लूट हाेत आहे. शेतकऱ्यांना कच्चा पावत्या दिल्या जात असून बफर स्टॉक रिलीज केला जात नाही.

त्यामुळे जिल्ह्याचे कृषी अधिकारी करतात तरी कायॽ राज्याचे आयुक्त, कृषीमंत्री, कृषी सेक्रेटरी याचे नियंत्रण का नाही असा सवाल आमदार धसांनी यावेळी केला. कांदा लागवडीसाठी अजून १५ दिवस आहेत. मागील वर्षी १४०० रुपये किलोचा भाव होता, यंदा अर्धा किलोचा भाव १४०० आहे. अाधीच कोरोनाने लुटले, आणखी किती लुटताॽ पीक कर्ज फक्त आठ टक्के वाटप झाले. मागील वर्षी पीक विम्याचा एक छदामही मिळाला नाही. १३ कोटी रुपये बीड जिल्ह्याला मिळाले. ७१०० कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरले. एवढी वाईट परिस्थिती जिल्ह्याची अाहे, याला जबाबदार सरकार असल्याची टीका धस यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...