आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी अतुल्य असे योगदान दिलेले आहे. त्यांचे विचार जनसामान्यांसाठी आजही ऊर्जास्रोत आहेत, असे प्रतिपादन प्रा. लक्ष्मण गुंजाळ यांनी केले. बीडपासून जवळच असलेल्या शिरापूर (धुमाळ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक व व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. गुंजाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच सुरेश जाधव होते, तर मंचावर संविधान युवा मंचचे राजेश शिंदे, ग्रामसेवक सानप, अमरसिंह ढाका, कॅप्टन राजाभाऊ आठवले, डी. जी. वानखेडे, भोले आदींची उपस्थिती होती. प्रतिमा पूजनानंतर उत्सव समितीच्या वतीने प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पाच विद्यार्थिनींची भाषणे झाली. त्यांना रोख पारितोषिके समितीच्या वतीने देण्यात आली.
प्रा. गुंजाळ म्हणाले की, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्याचा केंद्रबिंदू जनसामान्य माणूसच ठेवला होता. सामाजिक आणि संविधानिक कार्यातून त्यास सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, त्यास स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. जनसामान्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी मोठमोठे बंधारे बांधण्याची योजना केली. औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी कामगारांना वेतन, सुट्या, रजा या विशेष संधी सवलती दिल्या. कामगार आणि मालक यांचे संबंध सलोख्याचे राहावेत यासाठी घटनेत तरतुदी केल्या. वाईट चालीरीतींना विरोध करून समतेवर आधारित समाज रचना निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्त्रियांसाठी समान वेतनाची तरतूद केली. या सर्व जनकल्याणाच्या तरतुदी भारतीय संविधानात केल्या, असे प्रा. लक्ष्मण गुंजाळ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गायकवाड यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मनोज औसरमल यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.