आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:दीडशे सरपंचांमध्ये ‘कम्युनिटी कोविड केअर’बद्दल जागृती; डॉ. प्रदीप आवटे व डॉ. सुमेध यांचे मार्गदर्शन

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लातूर ग्रामीण, जिंतूरमधील सरपंचांनी घेतला सहभाग

कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरी भागाला, तर दुसऱ्या लाटेत गावांना जास्त फटका बसला. आरोग्य सुविधा मर्यादित असल्याने अनेकांचे हाल झाले. पण गावपातळीवरच ‘लोकसहभागाधारित कोविड केअर सेंटर’ असतील तर कोरोनावर मात करता येणे शक्य आहे. यावर भर देण्यासाठी व अशा सेंटरचे महत्त्व विशद करण्याच्या दृष्टीने राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे व कोविड रिस्पॉन्स सल्लागार डॉ. सुमेध यांनी कम्युनिटी कोविड केअर सेंटर (सीटूसीटू) या मॉडेलबद्दल जिंतूर, लातूर ग्रामीण व नवापूर मतदारसंघातील दीडशेंवर सरपंचांत जनजागृती केली. मुंबईतील संपर्क संस्था या कार्यात हातभार लावत आहे.

राज्यात कोविडच्या पहिल्या लाटेचा उपलब्ध आरोग्य संसाधने, यंत्रणेच्या वापरातून समर्थपणे सामना करण्यात आला. परंतु, दुसऱ्या लाटेत रुग्णही झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला. अशा स्थितीत शासनस्तरावर प्रयत्न सुरूच होते. सोबतच सामाजिक दायित्व म्हणून राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी असलेले डॉ. प्रदीप आवटे, कोविड केअर रिस्पॉन्स सल्लागार डॉ. सुमेध यांनी सहकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी संवाद साधला, चर्चा केली. तसेच कवठे पिराणप्रमाणे काही ठिकाणी लोकसहभागातून सुरू असलेल्या कोविड सेंटरचा अभ्यास करत तांत्रिकदृष्ट्या अधिक सुयोग्य व लोकोपयोगी ठरेल, अशा समुदाय आधारित कोविड सेंटरचा आराखडा निश्चित करण्यात आला. कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व कोविड केअर हॉस्पिटल अशा त्रिस्तरीय रचनेतून कोविडवर उपचार होतात. कोविडच्या १०० रुग्णांपैकी ८० रुग्ण हे लक्षणे नसलेली किंवा कमी लक्षण असलेली अशी असतात.

त्यामुळे लोकांनी लोकांसाठी सुरू केलेले व चालवलेले कोविड सेंटर म्हणजेच ‘सीटूसीटू’ जर ग्रामस्तरावर, स्थानिक पातळीवर कार्यान्वित झाले तर आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल. लोकांनाही गावातल्या गावात उपचार मिळू शकतील, या भूमिकेतून ‘सीटूसीटू’ हे मॉडेल डॉ. आवटे व डॉ. सुमेध यांनी मांडले. अभिनेता मोहंमद झिशान अय्युब यांच्या साथीने तसेच इतर माध्यमातून या मॉडेलबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. मुंबईस्थित संपर्क संस्थेच्या माध्यमातून १५ मे रोजी सामाजिक कार्यकर्ते, प्रातिनिधिक स्वरूपातील पत्रकार, डॉक्टर्स यांना या आराखड्याबाबत माहिती देण्यात आली.

त्यानंतर २२ मे रोजी संपर्क व आमदार मेघना बोर्डीकर यांच्या सहकार्यातून जिंतूर मतदारसंघातील सरपंचांपुढे सीटूसीटू हे मॉडेल मांडण्यात आले. ६ जून रोजी लातूर ग्रामीण, नवापूरसह इतर ठिकाणच्या शंभराहून अधिक सरपंचांनाही लोकसहभागाधारित कोविड केंद्राची माहिती डॉ. प्रदीप आवटे, डॉ. सुमेध यांनी दिली. सरपंचांनीही आपल्या शंका मांडत तज्ज्ञांकडून त्याचे निरसन करून घेतले. दीडशे गावांपैकी निम्म्या गावांनी जरी आपत्कालीन स्थितीत सीटूसीटूची यंत्रणा अवलंबली तर त्याचा निश्चित लाभ होईल.

सार्वजनिक आरोग्यासाठी लोकांनी योगदान द्यावे
आरोग्य हा विषय केवळ डॉक्टर्स, नर्सेस आणि दवाखान्यापुरता मर्यादित नाही तर तो सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून लोकांनी सार्वजनिक आरोग्य करता वेळोवेळी आपले योगदान दिले पाहिजे. समुदाय कोविड निगा केंद्र हे त्याचेच एक उदाहरण आहे. - डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी.

संसाधनांनुसार व्याप्ती वाढवता येऊ शकते
उपलब्ध संसाधनांची व्यवहार्यता पाहता सीटूसीटूची व्याप्ती वाढवली जाऊ शकते. तसेच केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरी भागात क्लब हाऊस, सोसायटीतील पार्किंगची जागा, रिकामा फ्लॅट अशा ठिकाणी तर ग्रामीण भागात सभागृह, शाळेचे वर्ग, समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालये अशा ठिकाणी सीटूसीटू सेंटर सुरू केले जाऊ शकतात.

आवश्यकतेनुसार सरपंच नक्की अंमलबजावणी करतील
लोकांनी लोकांसाठी उभारलेले आणि लोकांनीच चालवलेले समुदाय आधारित कोविड सेंटर हे आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका करण्यासह स्थानिक पातळीवर उपचाराची चांगली सोय करणारे मॉडेल आहे. संपर्क संस्थेच्या माध्यमातून ते सरपंचांपर्यंत मांडण्यात आले. आवश्यकतेनुसार सरपंच या उपक्रमाची नक्की अंमलबजावणी करतील.’ - डॉ. सुमेध, सल्लागार, कोविड रिस्पॉन्स टीम

बातम्या आणखी आहेत...