आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांत संताप:वर्षभरापूर्वीच बांधलेल्या दोन वर्गखोल्यांत गळतीमुळे पाणीच पाणी ; जिवाचीवाडी येथील प्रकार

केज13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिवाचीवाडी ( ता. केज) येथे गतवर्षी शाळाखोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र स्लॅब व्यवस्थित टाकण्यात न आल्याने छताला गळती लागली असून भिजण्याची वेळ आली आहे. जिवाची वाडी (ता. केज) येथे जि.प.ची इयत्ता पहिली ते ७ वीपर्यंत शाळा असून ९ वर्गखोल्या आहेत. या शाळेत ४०० विद्यार्थी शिक्षण घेत असून वर्गखोल्यांची दुरवस्था झाल्याने गतवर्षी दोन नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले. त्याचबरोबर इतर खोल्यांच्या दुरुस्तीचे कामही करून घेण्यात आले. मात्र नव्याने उभारण्यात आलेल्या वर्गखोल्यांवर टाकलेल्या स्लॅबचे काम निकृष्ट झाल्याने पावसाळ्यात त्यातून पाणी गळत आहे. यामुळे वर्गात पाणी साचत असून खोल्यांच्या गॅलरीलाही टपका लागला आहे. पाण्याची गळती थांबवण्यासाठी वर्गखोल्यांचे काम करणाऱ्या संबंधित गुत्तेदारांकडून दुरुस्तीचे काम करून द्यावे. वरिष्ठांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी माउली चौरे, राजाभाऊ केदार, भागवत चौरे, बाबुराव चौरे, नाना चौरे, श्रीराम चौरे, काशीनाथ चौरे, अनिल कांदे, शामराव फुंदे, शिवाजी चौरे यांनी केली आहे.

स्वच्छतागृहास टाळे, विद्यार्थी उघड्यावर
शाळेतील दोन्ही स्वच्छतागृहांना सध्या टाळे लावले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागत असून विद्यार्थिनींची कुचंबणा होत आहे. परिसरात गवत वाढले असल्यामुळे साप, विंचू चावण्याची भीती आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत पिण्यासाठी पाणी नाही
शाळेत पडून असलेला तांदूळ, मूगडाळ खिचडीला वापरली जात आहे. उरलेली खिचडी आवारातच टाकून दिली जाते. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व्यवस्था नाही.

संबंधित मुख्याध्यापकास दिल्या सूचना
सर्वशिक्षा अभियानातून दोन नवीन खोल्या बांधकाम झाले आहे. स्लॅबचा उतार व्यवस्थित न काढल्याने पावसाचे पाणी छतावरून व्हरांड्यात पडत आहे. ते व्यवस्थित करून घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकास दिल्या असून शाळेत पाण्याची व्यवस्था नसल्याने स्वच्छतागृह बंद आहेत.
-सुनील केंद्रे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, केज.

बातम्या आणखी आहेत...