आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वामी रामानंद तीर्थांमुळे अंबाजोगाई बनले मुक्तिसंग्रामाचे केंद्र, निझाम काळात राष्ट्रीय शिक्षणासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेची केली स्थापना

अंबाजोगाई (रवी मठपती)17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यार्थ्यांत स्वातंत्र्यासाठी त्यागाची भावना रुजवली

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे मराठवाड्यात अंबाजोगाई शहर मुक्तिसंग्रामाच्या लढ्याचे केंद्र बनले होते. केवळ लढाच नाही तर, निझाम काळात स्वामी रामानंद तीर्थ व सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेतून दिले जाणारे राष्ट्रीय शिक्षण हे अनेक संस्थांचे स्फूर्तिस्थान बनले. ३ ऑक्टोबर ही रामानंद तीर्थ यांची जयंती.

‘कोणत्याही क्षेत्रातील निरपेक्ष भावनेने केलेली सेवा ही शेवटी देशाला राजकीय दृष्टीने साहाय्यभूत ठरते’ या महात्मा गांधीजींच्या वाक्याने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांना दिशा दिली. त्यागी वृत्ती व निरपेक्ष सेवेस स्वामीजींनी केंद्रबिंदू मानत. ३ ऑक्टोबर १९०३ रोजी विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे व्यंकटेश भवानराव खेडगीकर यांचा जन्म झाला. संन्यास घेतल्यावर त्यांचे नाव स्वामी रामानंद तीर्थ झाले. सोलापूर, अंमळनेर व पुणे येथे शिक्षण घेतल्यानंतर तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा येथे राष्ट्रीय विचाराने प्रेरित झालेली मंडळी शाळा चालवत असत. पुढे ही शाळा मुक्तिलढ्याचं एक केंद्र बनली.

काही वर्षानंतर स्वामीजी, राघवेंद्रराव दिवान, बाबासाहेब परांजपे, बाबूराव कानडे, श्री. रं. देशपांडे इत्यादी शिक्षक हिप्परगा सोडून सन १९३५ मध्ये अंबाजोगाई येथे आले. ५ मे १९३५ अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात चालणाऱ्या पूर्वीच्या वर्गांचा विस्तार करून हायस्कूलचे वर्ग जोडण्यात आले. स्वामीजींमुळे त्या काळात राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा म्हणून अल्पावधीतच या संस्थेचा नावलौकिक झाला. १९३८ मध्ये या शाळेतून दहावीची पहिली बॅच बाहेर पडली. ही सातवीपर्यंतची शाळा आजही योगेश्वरी देवीच्या मंदिराजवळील जोगाई हॉलमध्ये भरते. निझामाच्या काळात उर्दू शाळांव्यतिरिक्त इतर शाळांना परवानगी मिळणेदेखील अशक्यप्राय गोष्ट होती. निझामाचा शाळाचालकांना जाचही असे. अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वामीजींनी ही शाळा यशस्वीपणे चालवली. अंबाजोगाई येथे त्यांनी तीन वर्षे सक्रिय राहून राष्ट्रीय शाळा करण्यासाठी प्रयत्न केला. स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांनी विनावेतन संस्थेच्या कार्यास वाहून घेतले त्यांना सर्व जनतेकडून सहकार्य लाभले. विशेष बाब म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांनी ही संस्था स्थापन करताना जातीय व धार्मिक विषमता आणि भेदाभेद नष्ट करण्यासाठी व सहशिक्षण देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. हीच परंपरा पुढे डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या नेतृत्वात जपली जात आहे.

मुक्तिसंग्रामातील योद्धे : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा तीव्र बनत चाललेला होता. स्वामीजींना शाळा व संस्थेचे कार्य इतर सहकाऱ्यांवर सोपवून लढ्याचे नेतृत्व केले. बाबासाहेब परांजपे व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण करून त्यासाठीची त्याग भावना रुजवली आणि त्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्तिसंग्रामात भरीव कार्य केले. या योगेश्वरी नूतन शाळेपासून प्रेरणा घेऊन मराठवाड्यात अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या त्या काळातही शाळा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे शक्ती केंद्र व मराठवाड्यातील शिक्षण संस्थांचे प्रेरणा केंद्र बनली होती.

बातम्या आणखी आहेत...