आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गमक:पालकांचे संस्कार, कुटुंब अन् मित्रांची साथ यामुळेच एवढे मोठे यश मिळवू शकलोत; महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. साळुंकेंचे प्रतिपादन, माजलगाव येथे नागरी सत्कार

माजलगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सादोळा या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. इथल्या जिल्हा परिषदेत शाळेत मी प्राथमिक शिक्षण घेतले. आईवडिलांचे संस्कार, कुटुंबातील सदस्य व मित्रांची साथ यामुळे आपण एवढे मोठे यश मिळवू शकलो. या यशाचे श्रेय मी माजलगावकरांनच देतो, अशी भावना महाराष्ट्र / गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. वसंतराव साळुंके यांनी व्यक्त केली.

माजलगावचे भूमिपुत्र अॅड.साळुंके यांची महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल माजलगाव येथे रविवारी (ता.३ एप्रिल) साळुंके यांचा सर्व पक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. यासह त्यांच्या मातोश्री रतनबाई ऊर्फ पद्मिनीबाई दिगंबरराव साळुंके यांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश सोळंके हे होते तर माजी न्यायमूर्ती पी.बी.गायकवाड यांच्या हस्ते साळुंकेंचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मोहनराव सोळुंके, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार आर.टी.देशमुख, भाजपचे नेते रमेशराव आडसकर, मोहनराव जगताप, बहुजन मुक्ती मोर्चा नेते बाबूराव पोटभरे, डॉ. प्रकाश आनंदगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अॅड.वसंतराव साळुंके यांचा सुंदरराव सोळंके महाविद्यालयात सत्कार करण्यात आला आणि त्यांची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वैष्णवी मंगल कार्यालयापर्यंत ही मिरवणूक पार पडली. ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक पार पडली. या शोभायात्रेनंतर मंगल कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रतनबाई साळुंके यांना प्रा.संगीता जाधव, सरपंच रूपाली कचरे, गौरी देशमुख यांच्या हस्ते साडी, पुष्पहार देत सन्मानित करण्यात आले.

माजी न्यायमूर्ती पी.बी.गायकवाड, रतनबाई साळुंके, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार आर.टी.देशमुख, बाबूराव पोटभरे, रमेशराव आडसकर, मोहनराव जगताप, डॉ. प्रकाश आनंदगावकर, महावीर मस्के, अच्युत लाटे, गंगाभीषण थावरे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार उमेशराव मोगरेकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.रमेशराव गटकळ, अशोक वाडेकर यांनी केले.

आभार संतोष जेथलिया यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, तुकाराम येवले, गणेश लोहीया, नारायण सातपुते, अशोक वाडेकर, सभापती संभाजी शेजूळ, संतोष आबड, रामकृष्ण सोळंके, मुकुंद सोंळके, बळीराम सोळंके, संतोष जेथलिया, अॅड. बी. आर. डक, अॅड. घाडगे, राऊत आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...