आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव तालुक्यातील टाकरवण व रामनगर परिसरात आठवडाभरपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागील आठ दिवसांत या परिसरात पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून माजलगाव ग्रामीण पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली.
माजलगाव तालुक्यातील टाकरवण जवळील रामनगर येथे दोन महिन्यांपूर्वी अश्रूबा सुपेकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी ३१ मे रोजी मध्यरात्री विष्णू खिलारे यांच्या घरी चोरी झाली यात सहा तोळे सोने चोरी गेले होते तर, कचरु अंबादास सावंत यांच्या घरुन तीन तोळे सोने चोरी गेले. पोपट सुपेकर यांच्या घरुन तीस हजारांची रोकड चोरी गेली होती.
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी गावातील राम डोके व प्रदीप मुळे यांच्या घरी चोरट्यांनी शिरुन चोरीचा प्रयत्न केला मात्र तो फसला. यानंतर मंगळवारी ७ जून रोजी पुन्हा चोरटे सक्रीय झाले. टाकरवण येथील गजानन कृषी सेवा केंद्राची खिडकी व सीसीटिव्ही कॅमेरा तोडून आत प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला तर एका हॉटेल व अभिमान शिंदे या नागरिकाच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला.
शिंदे यांच्या घरात चोर प्रवेश करताना आवाज झाल्याने त्यांना जाग आली व चोरटे पसार झाले. ग्रामस्थांनी चोरट्यांचा पाठलाग केला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी माजलगाव ग्रामीण पोलिसांची भेट घेत तक्रार दिली व या परिसरात पोलिसांनी रात्र गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.