आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाजोगाईसारख्या धार्मिक अधिष्ठान असलेल्या नगरीत पासोडीकार सर्वज्ञ दासोपंताचे वाड्मयीन कर्तृत्व मोठे आहे. सर्वज्ञ दासोपंतांच्या कुलपरंपरेत श्री दत्तात्रयाचीच उपासना असल्याने आजही दासोपंतांच्या देवघरात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शेकडो वर्षांची ही परंपरा जोपासण्यासाठी अंबाजोगाईकर उत्साहाने पुढे येतात.
मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती महोत्सवाची धुमधाम सुरु असते. अंबाजोगाईत प्रथेप्रमाणे पौर्णिमेस दत्तजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात दासोपंतांच्या देवघरात श्रध्दा आणि भक्तीने साजरा होतो. दासोपंतांची पदे त्यांचे वंशज, शिष्य यांच्यासह अनेकांनी प्रसिध्द केली. शहरातील जुन्या भागातील देशपांडे गल्लीत दासोपंतांचे देवघर आहे. थोरले देवघर व धाकटे देवघर अशी आज दिसणारी विभागणी नंतरच्या काळात झाली असावी, असा अंदाज बांधला जातो. दासोपंतांच्या काव्यरचनेचे प्रयोजन दत्तभक्ती, भक्तांना उपदेश असेच आहे. अनेक वर्षाची परंपरा लाभलेला तसेच सांस्कृतिक व कलात्मक दृष्टीने महत्वपुर्ण व असलेला दत्त जयंती मार्गशिर्ष नवरात्र महोत्सव असून सप्तमी ते पोर्णिमा या कालावधीत दत्त संस्थान देवघर येथे संपन्न होतो.
यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नृत्य, गायन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम होतात. नंतर मंदिर परिसरात पालखी मिरवणूक असते. दत्तजयंती दिनी दुपारी गायन आणि सायंकाळी गुरूपुजन व अवतारोत्सव सोहळा संपन्न होतो. प्रातःसमयी प्रवचन व पालखी सोहळा तसेच दत्त सहस्त्रनाम, षोडशोवतार हवन (होम) होऊन पुर्णाहुती होते. दुसऱ्या दिवशी प्रातः समयी प्रवचन,पालखी सोहळा त्यानंतर लळीत लोककला सादरीकरणाने दत्तजयंती महोत्सवाचा समारोप होतो. या सर्व कार्यक्रमास भाविके उपस्थित असतात. दत्त सांप्रदायातील माहिती देण्याच्या उद्देशाने आता नव्या साधनांची निर्मिती अलिकडच्या काळात झाली आहे.
साडेचारशे वर्षांपूर्वी दिली मूर्ती दासोपंतांच्या वाङ्मय मंदिराचा कळस म्हणजे त्यांची पंचीकरण ‘पासोडी’ होय. ४० फूट लांब आणि चार फूट रुंद अशा कापडावर मांडलेली ही पासोडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही ओळख जपली जात आहेच. यासोबतच दत्त महोत्सवानिमित्त अंबाजोगाईतील देवघर येथे सर्वज्ञ दासोपंतकृत एकमुखी दत्त मुर्तीचीही साधना केली जाते. साडेचारशे वर्षापुर्वी दासोपंतांनी भक्तांना दर्शनासाठी ही मूर्ती दिल्याचे सांगितले जाते. अभिषेक, मंत्र अनुष्ठान, वेदोक्त श्लोक, स्ताेत्र, अष्टक, महानिरांजन, प्रदक्षिणा, दासोपंत रचित भजन आदी कार्यक्रम दत्त जयंती महोत्सवात घेऊन या दत्तांची आराधान केली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.