आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तक प्रकाशन समारंभ:शिक्षण हे माणसाचे मोठेपणा मोजण्याचे परिमाण नाहीच

अंबाजोगाई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हे माणसाचे मोठेपणा मोजण्याचे परिमाण होऊच शकत नाही, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी दगडू लोमटे यांनी लिहिलेल्या ‘राहून गेलेली पत्रं’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना व्यक्त केले.

येथील नगर परिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. रोडे बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या हस्ते, तर मुक्त पत्रकार व साहित्यिक अमर हबीब यांच्या अध्यक्षतेत या पुस्तकाचे प्रकाशन केले. या कार्यक्रमास अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे व मसाप केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रा. किरण सगर, लेखक बालाजी सुतार, भगवानराव शिंदे, अक्षय मुंदडा, राजकिशोर मोदी, डॉ. नरेंद्र काळे, सतीश लोमटे, राहुल गदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. रोडे यांनी लोमटे यांनी या पुस्तकात लिहिलेल्या पत्रात त्या त्या व्यक्तीच्या जीवनाचे अनेक कंगोरे समोर आणण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि ‘भारत जोडो’अभियान या दोन क्षेत्रांत केलेल्या कामामुळे दगडू लोमटे यांच्या जीवनाला, व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. रंगनाथ तिवारी यांनी गाजलेल्या पत्रांचा ओझरता उल्लेख केला. दगडू लोमटे यांनी लिहिलेली पत्रे वाचताना व्यक्ती जिवंत व्हावी अशा प्रकारचे लिखाण केले, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक अमर हबीब यांनी केला. लेखक दगडू लोमटे यांनी “राहून गेलेली पत्रं’ या पुस्तकाच्या निर्मितीची संकल्पना विशद केली. जीवनपटावरील मोकळी राहिलेली रिक्त जागा भरण्यासाठी ही सर्व राहून गेलेली पत्रे लिहिलीत, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मसाप शाखेचे सचिव गोरख शेंद्रे, उपाध्यक्ष डॉ. राहुल धाकडे, कोषाध्यक्षा डॉ. शैलजा बरुरे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अभिजित जोंधळे, तर आभार संतोष मोहिते यांनी मानले. या कार्यक्रमास शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...