आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:वाघोली शैक्षणिक प्रकल्पात दिले जाणार शिक्षण; संपर्क करण्याचे आवाहन

आष्टी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक कामांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या भारतीय जैन संघटनेच्या वतीने आता कोविडमध्ये छत्र हरपलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी उपक्रम हाती घेतला आहे. बीजेएसच्या पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील शैक्षणिक प्रकल्पात या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी गरजूंनी बीजेएसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. विशेषत: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले होते. यामध्ये अनेक बालकांनी मातेचे, पित्याचे किंवा दोघांचेही छत्र गमावले. कोरोनात अनाथ झालेल्या बालकांचा हा आकडा जिल्ह्यात सुमारे ५०० इतका आहे, तर १६ बालकांनी दोन्हीही पालक गमावले आहेत. भारतीय जैन संघटना ही सामाजिक कामांमध्ये सातत्याने पुढाकार घेत असते.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र शांतीलालजी मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून बीजेएसने समाजोपयोगी कामात पुढाकार घेतला आहे. गरीब, गरजू, अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बीजेएसने अनेक वर्षांपासून काम केलेले आहे. भूकंपग्रस्त भागातील मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यानंतर आता बीजेएसने नव्या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना शिक्षणाची सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आष्टी तालुक्यातील गरजू व्यक्तींनी आष्टी तालुका अध्यक्ष शेखर मुथा व सचिव प्रतिम बोगावत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

१२ वीपर्यंत शैक्षणिक पुनर्वसन
प्रवेश घेणारा बालक इयत्ता ५ वी, ६ वी अथवा ७ वी मध्येच प्रवेशास पात्र असले पाहिजे. एका कुटुंबातील १ किंवा २ बालकांनाच प्रवेश दिला जाईल. वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील वसतिगृहामध्ये शिक्षणासाठी पाठवण्याबाबत बालकाच्या पालकांची संमती असणे आवश्यक आहे. १२ वीपर्यंत मोफत शैक्षणिक पुनर्वसन केले जाईल.

वाघोली प्रकल्प मोठा
बीजेएसचा वाघोली येथील शैक्षणिक प्रकल्प मोठा असून शेकडो विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण गरजू मुलांना इथे दिले जाते. यापूर्वी बीजेएसने बीड जिल्ह्यात मूल्यवर्धित शिक्षणासाठीही उपक्रम राबवला होता. आता कोविड अनाथांना आधार देण्याचे काम केले जात आहे.

बीजेएसने पुढाकार घेत दुष्काळातही केले होते मोठे काम
बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी भीषण दुष्काळी स्थिती असताना बीजेएसने पुढाकार घेत मोठे काम केले होते. आपत्तीला इष्टापत्ती समजून कोरड्या पडलेल्या प्रकल्पातील गाळ काढला होता. यामुळे प्रकल्पाच्या साठवण क्षमतेत वाढ झाली होती.

बातम्या आणखी आहेत...