आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक विकास:विद्यार्थी, शिक्षक व पालक या तिघांच्या समन्वयातूनच शैक्षणिक विकास शक्य

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थी हा आयुष्यातील फार मोठा काळ त्याच्या शिक्षकाच्या सानिध्यात ज्ञानगृहण करत असतो. त्याचे पालकांशी नाते तर असतेच परंतु विद्यार्थ्याचे शिक्षकासोबत दृढ नाते असल्याशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांची व शिक्षकांची ओळख करून दिली पाहिजे. जेणेकरून तिन्ही घटकांमध्ये समन्वय व सुसंवाद साधणे शक्य होऊन विद्यार्थ्यांचा विकास साध्य करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन प्राचार्य आबासाहेब हांगे यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त आयोजित ‘विद्यार्थी-शिक्षक-पालक’ मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नांदेड येथे कार्यरत सहाय्यक वाहन निरीक्षक नितीन राख, माजी नगरसेवक संदीप जाधव होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रोफेसर किशोर मचाले, पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड आदि उपस्थित होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात माजी विद्यार्थी व पालक समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. बळीराम राख यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

यानंतर पालकांमधून प्रातिनिधिक स्वरूपात प्रा. कावेरी खुरणे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधून भाग्यश्री नागरगोजे, ईश्वरी सुसलादे, ज्योती वाळेकर, आरती वाळेकर, रुपाली डोके, अमोल साबळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. नितीन राख यांनी स्वानुभवावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत महाविद्यालयीन जीवनात आलेल्या अडचणींचा सामना कसा करावा व स्पर्धा परीक्षांची तयारी व अभ्यास कशा पद्धतीने करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांसाठी वेळ देणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जयंत साठे यांनी केले. आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. कुशाबा साळुंके यांनी केले. मेळाव्यास विद्यार्थी, पालक व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

जोधाप्रसादजी मोदी विद्यालय, अंबाजोगाई अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सी.व्ही.गायकवाड होते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ व पेन देऊन कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी तनिष्का अवतारे, भारती परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना शिक्षकांनी आम्हाला जे ज्ञानदान केले, त्याची परतफेड कधीच करता येणार नसल्याचे सांगितले.

चांगला नागरिक बनून शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचे चीज करू, असे याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांगितले. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक विनायक मुंजे, राजेश कांबळे, बालाजी अंबाड, वर्षा गुळवे, बालासाहेब इंगळे, भगवंत पवार, नानासाहेब गायके, दीपमाला गजभिये, शंकर शिनगारे, उदयकुमार पाळेकर, विकास शिंदे उपस्थित होते. शाळेच्या वतीनेही शिक्षकांचा मुख्याध्यापक सी.व्ही.गायकवाड यांनी सत्कार केला व सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. विनायक मुंजे व मुख्याध्यापक सी.व्ही.गायकवाड यांनी शिक्षक दिनाबाबतची महती विशद करून सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

डॉ.आंबेडकर विद्यालयात शिक्षकांचा सत्कार बीड येथील आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन‌् यांची जयंती आणि शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शिक्षकांचा सत्कार आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ बीडचे सर्व संचालक आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.ए. हावळे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. मान्यवरांनी शिक्षक दिनाचे महत्व या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ.आंबेडकर विद्यालयात शिक्षकांचा सत्कार
शिक्षक पिढी घडवत असतात. त्यांचा सन्मान म्हणजे मानवी मुल्यांचा, तत्वांचा सन्मान होय, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (प्रा.) कुलकर्णी यांनी केले. विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य प्रशांत पवळ, किर्ती पांगारकर, पर्यवेक्षक अमरापूरकर, पयवेक्षक गाडेकर आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...