आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:अपघातग्रस्त ट्रकवर आठ वाहने धडकली; 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोळवाडीनजीक नारळाचा ट्रक पलटल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. याच दरम्यान भरधाव येणाऱ्या सिमेंटच्या ट्रकने तेथे उभ्या असलेल्या दोन रिक्षांना जोराची धडक दिली. या अपघातात १३ वर्षीय मुलगी जागीच ठार झाली, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. यापाठोपाठ अन्य तीन ते चार वाहने अपघातग्रस्त वाहनांवर धडकली. मदतकार्य करणाऱ्या एका पोलिसालाही वाहनाने जोराची धडक दिल्याने तोही जखमी झाला.

गुरुवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास नारळ घेऊन जाणारा टेम्पो (एचआर ५५ बीई ८३९७) हा कोळवाडीजवळ उलटला. याची माहिती महामार्ग पोलिसांसह आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी महामार्ग पोलिस पीएसआय यशराज घोडके आणि त्यांचे कर्मचारी हे मदतकार्यासाठी तेथे आले होते. मदतकार्य सुरू असताना तेथे रिक्षा (एमएच २३ एआर ०४६८) तसेच भाजीपाला घेऊन बीडकडे येणारा रिक्षा (एमएच २३ एक्स ५४७०) व कार (एमपी ६८ सी २६१८) रस्त्याच्या बाजूला उभे होते. या वेळी सिमेंट घेऊन येणारा ट्रक (एमएच १८ एए ९६७९) रिक्षा व कारला धडकला. या वेळी एका रिक्षात बसलेली वैष्णवी आनंद आडगळे (१३, रा. शाहूनगर, बीड) हिचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. धनंजय बापू वाघमारे (३९, रा. पाली) हे जखमी झाले आहेत. दुसऱ्या रिक्षातील रवींद्र नवनाथ ढाकणे (४५, रा. ढाकणवाडी, ता. केज) हे जखमी झाले आहेत. या वेळी अपघातग्रस्तांना मदत करत असताना अमलदार विलास यादवराव ठोंबरे हे जखमी झाले.

जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. याच वेळी दोन दुचाकीही यात पलटी झाल्या. एकावर एक आठ वाहने आदळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, नंतर मात्र सुरळीत झाली.

काही अंतरावरच आणखी १ अपघात
महामार्ग पोलिसांनी मदत करत एका बाजूने वाहतूक सुरू केली. त्यानंतर साडेचार वाजता सोलापूरकडून औरंगाबादकडे येणारा ट्रक (आरजे १४ जीके ०५९८) हा भरधाव येऊन पलटी होऊन बीड-सोलापूरकडे जाणारा ट्रक (एमएच २३ एयू ९५००) या ट्रकवर जाऊन धडकला. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आयआरबीच्या क्रेनने दोन्ही ट्रक बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, आयआरबीच्या वतीने कोळवाडी येथे सर्व्हिस रोड न केल्याने महामार्गावर दिशादर्शक फलक न लावल्याने आणि पथदिवे नसल्याने वारंवार अपघात होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...