आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित अठराव्या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बीडच्या परिवर्तन प्रतिष्ठान निर्मित व युवा प्रबोधन प्रस्तुत डॉ. सतीश साळुंके लिखित ‘प्रायश्चित्त’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट सहा पुरस्कार मिळवून प्रथम क्रमांक पटकावल्याची घोषणा मुंबईत सांस्कृतिक संचालक श्री बिभिषण चवरे यांनी केली. कोरोनामुळे दोन वर्षानंतर झालेल्या या स्पर्धेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
जवळपास ३८० बालनाटकांतून निवडलेल्या उत्कृष्ट २० नाटकांची अंतिम फेरी सोलापूर येथे पार पडली. यात ‘प्रायश्चित्त’ने पहिला नंबर पटकावला. सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनाचा पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार प्रसिध्द नाट्यलेखक डॉ. सतीश साळुंके यांना ‘प्रायश्चित्त’ नाटकासाठी घोषित करण्यात आला; तर दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार अशोक घोलप यांना मिळाला. नेपथ्यासाठीचा द्वितीय पुरस्कार नितीन धायगुडे यांना तर रंगभूषेचा द्वितीय पुरस्कार सुधा सतीश साळुंके यांना मिळाला.
उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक मुलींमधून श्रद्धा आनंद वाघुंबरे हिला तर मुलांमधून कबीर अंबादास आगे या बाल कलावंतांनी पटकावून राज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेते परिवर्तन नाट्य विद्यालयाचेच असल्याचे सिद्ध केले. परिवर्तनच्या यशाबद्दल सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, पद्मश्री वामन केंद्रे, सांस्कृतिक संचालक बिभिषन चवरे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह प्रा.डॉ.दादा गोरे, बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी ठोंबरे, नाटककार प्रा.दत्ता भगत, प्रा. अजित दळवी, प्रा. डॉ. दिलीप घारे, संस्कार प्रबोधनीचे सचिव अॅड. कालीदासराव थिगळे, उपाध्यक्ष नामदेवराव क्षीरसागर यांच्यासह महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील अनेक रंगकर्मींनी परिवर्तन प्रतिष्ठानचे अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.