आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ७०० कर्मचाऱ्यांनी १९ महिन्यांचे थकीत वेतन न मिळाल्याने १० मार्च रोजी साखर कारखान्यावरील वजनकाटा बंद करून गोंधळ घातला. कारखान्याचे एमडी औरंगाबादला गेल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केला. जोपर्यंत पगार नाही तोपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, कामगार व अधिकारी यांच्यात बाचाबाची होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
एकेकाळी वैद्यनाथ साखर कारखाना आशिया खंडात नावाजला गेला. परंतु, मागच्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ या कारणांमुळे हा साखर कारखाना अडचणीत आलेला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते. दरम्यान, आताही कर्मचाऱ्यांचे १९ महिन्यांचे वेतन थकलेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालक दिक्षतुलू यांना निवेदन देत, अन्यथा आम्ही कारखाना बंद करू, असा इशारा दिला होता. दहा दिवस उलटूनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच कारखाना बंद केला. वजनकाटा व सर्व कार्यालयांचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
हा कारखाना यंदा सुरू करण्यात आला होता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला होता. पण पगार मात्र थकीत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांनी हे संपाचे हत्यार उपसले. कारखान्याचे एमडी औरंगाबादला गेल्यानंतर हा प्रकार घडल्याचा आरोप संचालकांनी केला.
साखर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी आमने-सामने
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर बुधवारी सातशे कर्मचाऱ्यांनी कारखाना बंद केला आहे. दरम्यान, अधिकारी व कर्मचारी यांच्यात बाचाबाची होऊन काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, कारखाना परिसरात पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुर्भे यांनी भेट दिली.
शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रकार
पंकजा मुंडे यांनी अडचणींवर मात करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कारखाना सुरू केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी गोंधळ घातला. चांगल्या कामात खीळ घालण्याचा व शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रकार आहे. जो खडखडाट चालू राहावा यासाठी अनेक दिवस नियोजन सुरू होते, असा आराेप कारखान्याचे संचालक शिवाजीराव गुट्टे, व्यंकटराव कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी पत्रकान्वये केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.