आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रम:नोटिसा देऊनही अतिक्रमणे काढली नाही; 67 गाळे बंदोबस्तात सील

अंबाजोगाई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अनधिकृत अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी होऊन हे अतिक्रमण हटवण्याचे आदेश देताच अंबाजोगाई नगरपालिकेने ६७ अतिक्रमणधारकांना १ ऑगस्टपर्यंत आपली अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. नोटिसा देऊनही अतिक्रमणे न काढल्याने मंगळवारी सकाळी १० वाजेपासून नगरपालिकेने पोलिसांच्या बंदोबस्तात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व मेडिकल परिसरातील कॉम्प्लेक्सच्या गाळ्यातील अतिक्रमणावर कारवाई करत ६७ गाळे सील केले.

नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी हे गाळे बांधले होते. या दोन्ही ठिकाणच्या गाळ्यात अपात्र आणि अतिक्रमणे होती. नगर परिषदेने वारंवार नोटिसा देऊनही ही अतिक्रमणे काढली जात नव्हती. काही जणांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. दोन्ही ठिकाणच्या गाळ्यातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. नगर परिषदेने ६७ अतिक्रमणधारकांना १ आॅगस्ट २०२२ पर्यंत अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. नाेटिशीला न जुमानता काहींनी स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. शेवटी मंगळवारी सकाळपासून नगर परिषदेने अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. ही कारवाई उपजिल्हाधिकारी शरद घाडगे यांच्या नियंत्रणात करण्यात आली.

रेखावार यांनीही दिल्या होत्या सूचना
गाळ्यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अंबाजोगाई येथे काही महिन्यांपूर्वी भेट देत येथील गाळेधारकांचे म्हणणे ऐकून घेतले हाेते. या वेळी काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानंतर ६७ दुकानदारांना अपात्र ठरवले होते.

चार अधिकारी, २५ पोलिसांचा फौजफाटा
शहरातील दाेन ठिकाणच्या गाळ्यातील अतिक्रमणे काढताना पोलिस बंदोबस्त वाढवला होता. शिवाय नगर परिषदेची पूर्ण टीम दाखल झाली होती. पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवारांच्या नेतृत्वात ४ पाेलिस अधिकारी व २५ पोलिस तैनात होते.
अधिकृत गाळेधारकांनाही रक्कम भरावी लागणार
६७ अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा दुकानदारांना अपात्र ठरवले होते. अधिकृत गाळेधारकांनी ताबा घेतल्यापासून आजपर्यंतची फी स्वरूपातील रक्कम भरावी. -अशोक साबळे, मुख्याधिकारी, अंबाजोगाई नगरपालिका.

बातम्या आणखी आहेत...