आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रशासनाने एमपीडीए कायद्याखाली स्थान बध्द केल्यानंतर या निर्णयाला शासन दरबारी आव्हान देऊन ६ डिसेंबरला हर्सूल कारागृहातून सुटलेल्या नेकनूर येथील बबन पवार याने चारच दिवसांत पुन्हा गांजाची तस्करी सुरु केली. नेकनूर पोलिस आणि एलसीबीने रविवारी धाड टाकून ११ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत बबन पवार फरार झाला मात्र त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली.
बबन शामराव पवार, सत्यभामा बबन पवार (दोघे रा.नेकनूर) अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. बबन पवार याच्यावर हातभट्टी दारू बनविणे, विक्री करणे, जवळ बाळगणे याचे ५ गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर एमपीडीएनुसार १४ नोव्हेंबर रोजी कारवाई करुन हर्सूल कारागृहात स्थान बध्द केले होते. एमपीडीएनुसार कारवाई केल्यावर गृह विभागाकडून १२ दिवसांच्या आत मान्यता घ्यावी लागते. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबरला दिलेला प्रस्ताव गृहविभागाने फेटाळला. बबन पवारची स्थानबध्दतेतून सुटका करण्याचे आदेश २६ नोव्हेंबरला दिले. ६ डिसेंबरला बबन पवार कारा गृहाबाहेर आला.
कारागृहातून सुटताच बबनने गांजा च्या धंद्यात प्रवेश केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पो.नि.सतीश वाघ यांना मिळाली होती. धाडीत पत्र्याच्या शेड मधील एका खाटेखाली निळ्या रंगाच्या बॅगेत एक लाख १६ हजार ९६० रुपये किमतीचा ११ किलो ६६९ ग्रॅम गांजा आढळून आला. तो जप्त केला असून सत्यभामा पवार ताब्यात आहे तर बबन पवार हा फरार आहे. त्या दोघांवर गुंगी कारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, सहायक उपनिरीक्षक वचिष्ठ कांगणे, संजय जायभाये, हवालदार कैलास ठोंबरे, राहुल शिंदे, अशोक दुबाले, सतीश कातखडे, नसीर शेख, गणेश मराडे, देविदास जमदाडे, शुभांगी खरात यांनी नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्या सहकार्याने बबन पवारच्या घराची शासकीय पंचांसमक्ष झडती घेेत कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.