आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेज शहरातील लोकसंख्या वाढल्याने शहराचा विस्तार ही झपाट्याने झाला आहे. नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर विस्तारीत भागातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या. मात्र, अपुऱ्या निधीमुळे ग्रामपंचायतीला विस्तारलेल्या भागापर्यंत मूलभूत सुविधा नेता आल्या नाहीत. दोन पंचवार्षिकच्या पदाधिकाऱ्याचा कार्यकाळ पूर्ण होऊन तिसऱ्या पंचवार्षिकचे पदाधिकारी पदावर विराजमान आहेत. तरी शहराच्या विस्तारित भागात नळ योजना, रस्ते, नाल्यांचा प्रश्न सुटलेला नाही.
केज शहराची लोकसंख्या ही ३० हजाराहून अधिक आहे. तर शहराचा विस्तार बीड, धारूर, कळंब आणि अंबाजोगाई रस्त्यालगत वाढत चालला आहे. लोकसंख्येची वाढ आणि विस्तार झालेल्या भागापर्यंत अपुऱ्या निधीमुळे विकासाची कामे ग्रामपंचायतीला मार्गी लावता येत नव्हती. त्यात आमदार फंडातून अनेक भागातील रस्ते, नाल्यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला होता. मात्र नळ योजना विस्तारीत झाली नव्हती. शहराच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा अशी मागणी वाढली. त्यानंतर सन २०१० मध्ये शहरात नगरपंचायत अस्तित्वात आली.
नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत गेली. विस्तारलेल्या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविल्या जातील अशी आस लागली. नगरपंचायतीच्या निवडणुका होऊन पदाधिकारी विराजमान झाले. सुरुवातीची पाच वर्षे रस्ते, नाल्यांच्या कामांवर खर्च झाला. मात्र कालबाह्य झालेली पाईप लाईन बदलून घेतली नाही. तर विस्तारलेल्या भागापर्यंत धनेगाव धरणाची नळ योजना गेली नाही. अनेक भागातील नागरिक हे बोअरवर आपली तहान भागवित असताना निवडणुकीच्या प्रचारात या मुद्द्यांना हात घालत पोळी भाजून घेण्यात आली.
निवडणुकीनंतर या प्रश्नांना बगल दिली गेल्याने विस्तारलेला भाग उपेक्षित राहिला. दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर शहरातील प्रमुख प्रभागावर सत्ताधारी आणि विरोधी गटाची मेहरबानी राहिल्याने रस्ते, नाल्यांचे प्रश्न सुटले. मात्र विस्तारलेल्या भागाची पुन्हा निराशा झाली. नळ योजना आली नाही, तर रस्ते, नाल्यांचे प्रश्न सुटले नाहीत. आता तिसऱ्या पंचवार्षिकची निवडणूक होऊन सत्तेवर विराजमान झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र आणखी विकास कामांना गती मिळालेली नाही.
त्यामुळे येणाऱ्या काळात तरी विस्तारलेल्या भागापर्यंत मांजरा धरणाचे पाणी पाईप लाईनद्वारे जाणार का ? असा प्रश्न सध्या तरी अनुउत्तरीत असून नळ योजना, रस्ते, नाल्यांसह मूलभूत सुविधांची येण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. केज शहरात मंजुरी मिळालेले सांस्कृतिक सभागृह आणखी उभे राहिलेले नसून क्रीडा संकुलचा प्रश्न सुटलेला नाही. शहरात बगीचा अथवा इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध झालेली नाहीत. सार्वजनिक ठिकाणी मुतारी, शौचालय नसल्याने शहरातून वावरताना महिलांची कुचंबणा होते. यासह इतर विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
व्यापारी संकुलाचा प्रश्न प्रलंबित केज शहरात व्यापारी संकुल नसल्याने मुख्य रस्त्याच्या बाजूने अतिक्रमण करून छोटे व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत. त्यात अतिक्रमणाच्या जागेवर भाडे वसुलीचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तर व्यापारी हजारो रुपयांचा किराया देऊन व्यापार करीत आहेत. त्यामुळे व्यापारी बांधवांतून व्यापारी संकुल उभारणीची मागणी कायम आहे. त्यासाठी सत्ताधारी गटाने प्रयत्न करीत जागा, निधीसाठी पराकाष्ठा केली. मात्र आणखी हा प्रश्न प्रलंबित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.