आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोगत:पॅकेजनंतरही वाढताय शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ही ठरतेय चिंतेची बाब

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कें द्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करते. नुकसान भरपाईचे पॅकेज, दर दहा-पाच वर्षाला कर्जमाफी, कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान, शेतकरी सन्मानसारख्या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर ६००० रुपये वार्षिक अनुदान जमा करीत असले तरीही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होण्याच्या ऐवजी अधिक गतीने वाढतेय ही चिंतेची बाब बनलीय खुल्या बाजार व्यवस्थेचे कुठलेच फायदे शेतकऱ्यांना मिळू नयेत अशी व्यवस्था यांच्या खुळचट अट्टहासातून निर्माण होत आहे असे मत ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोहिते यांनी व्यक्त केले.

डाॅ. माेहिते म्हणाले, १९९० नंतर भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण अवलंबले. १९९० पूर्वीच्या मिश्र अर्थव्यवस्थेच्या काळात देशाची काही ठरावीक क्षेत्रात थोडीबहुत प्रगती झाली तरी एकूण अर्थव्यवस्थेचा गाडा रुतलेलाच होता. त्या कालखंडात ना उद्योगधंद्याची भरभराट झाली, ना शेतीची भरभराट झाली. १९९१ सालानंतर मात्र जीवनाच्या अनेक क्षेत्रात जे अनुकूल बदल घडून येत आहेत त्यावरून भारतीय अर्थव्यवस्थेने कात टाकून नव्या पर्वात प्रवेश केल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. मधल्या काळात अनेक संकटे आली तरीही आपल्या देशातील आर्थिक विकासाचा-प्रगतीचा दर, सरकार बदलले, सत्ताधारी पक्ष बदलले तरी सतत वाढता असून एकूणच देशाच्या प्रगतीविषयी आशादायी चित्र उभे राहिले आहे. सुधारणा घडवून आणण्यात महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर यांचे स्थान जसे मोठे आहे तसेच केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचे स्थानही मोठे आहे. त्या काळात प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘भिक्षुकशाहीचे बंड’ या ग्रंथासहित जे जे ग्रंथ लिहिले त्या सर्व ग्रंथांसाठी राजर्षी शाहूंनी त्यांना आर्थिक साहाय्य केले. पण काही वेळा व्यक्तिगत कारणासाठी शाहू महाराजांनी जेव्हा आर्थिक मदत दिली ती प्रबोधनकार ठाकरे यांनी स्वीकारली नाही याची इतिहासात नोंद आहे.

खुल्या बाजारव्यवस्थेचे फायदे शेतकऱ्यांना मिळेना
आज ‘कंत्राटी शेती’ आणि ‘कॉर्पोरेट फार्मिंग’ची चर्चा सुरू आहे. ती चर्चा नुसती कानावर आली तरी आमचे काही साहित्यिक मित्र कावरेबावरे होतात. एकेकाळी आगबोटीत बसून विलायतेला शिकायला जाणाऱ्यांविषयीदेखील हीच भावना व्यक्त केली गेली होती. बाहेरच्या जगातील काही गोष्टी येथे आल्या म्हणजे जणू काय इथली अर्थव्यवस्था, समाज, संस्कृती नष्ट होणार आहे, अशी धारणा ठेवून आदळआपट केली गेली होती. पण प्रत्यक्ष शेती करणाऱ्यांना ती करताना काय यातना सहन कराव्या लागतात याची प्रत्यक्ष अनुभूती नसल्याने शेती करणाऱ्यांची भावना काय आहे हे लक्षात न घेताच त्यांची बाजू घेतल्याचा आव आणून त्यांच्या भल्यासाठीच आम्ही सर्व बाबींना विरोध करीत आहोत असा आभास निर्माण केला जातो आहे.

शेतीतून स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले
आज शेतीमध्ये केवळ साठी ओलांडलेली वृद्ध माणसेच राहिली आहेत. शेतीमधून स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकेकाळी केवळ शेती किंवा मजुरी करणारी तरुण मुले शिकली, पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतले. पण त्या पदव्या कुचकामी आहेत. आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात आल्यावर ही तरुण मुले ऑटोरिक्षा, टमटम, टेम्पो, ट्रॅक्टर, जेसीबी चालवायला लागली. पानपट्टी, मोबाइलचे दुकान, बांधकाम साहित्याची विक्री, सायबर कॅफे इकडे वळली आणि तगली.

बातम्या आणखी आहेत...