आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्यांचा वाढता आलेख:राज्यात रोज 20 चिमुकल्या मुली लैंगिक छळाच्या शिकार; 3 वर्षांत तब्बल 21,387 गुन्हे

अमोल मुळे | बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘सीसीटीएनएस’चा अहवाल : बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चढता, शाळांतून दिले जावेत स्पर्शज्ञानाचे धडे

अकोला जिल्ह्यात अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम धामणदरी (ता. बार्शीटाकळी) गावातील शाळेत शिकणाऱ्या ९ ते १० वर्षांच्या चार मुलींवर शाळेतील दोन शिक्षकांनी अत्याचार केल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या शिक्षकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अशा किळसवाण्या प्रकारचे अकोला जिल्ह्यातील एक घटना म्हणजे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कारण, राज्यात सरासरी रोज २० अल्पवयीन मुली अशा विविध घटनांत लैंगिक अत्याचाराच्या शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या “सीसीटीएनएस’ (क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम) अहवालातून समोर आली आहे.

वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ या तीन वर्षांत राज्यात घडलेल्या अशा घटनांचा आलेख सतत वाढताच असून मागील ३ वर्षांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तब्बल २१ हजार ३८७ गुन्ह्यांची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. अशा बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये अनेकदा परिचितांकडूनच अत्याचार होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. नातेवाईक असोत किंवा शेजारी तसेच ओळखीचे लोक हे अल्पवयीन चिमुकल्या मुलींच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन कधी पैशांचे, चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार करतात, तर किशोरवयीन मुलींना अनेकदा लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे प्रकार घडले आहेत. ही आकडेवारी पाहता राज्यातील बाललैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत.

जवळच्या, नात्यातील किंवा ओळखीतील लोकांकडूनच होतात अत्याचाराचे बहुतांश गुन्हे

पोक्सो कायद्याचे संरक्षण तरी...

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनांतील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ मध्ये तयार केलेला कायदा आहे. अल्पवयील मुलींवरील अत्याचार, विनयभंग, पोर्नाेग्राफीसंबंधी गुन्हे या कायद्याच्या विविध कलमांखाली नोंदवले जातात. यात, विविध कलमांनुसार सहा वर्षे ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. तरी अशा गुन्ह्यांची संख्या वाढत आहे.

९० दिवसांत २ हजार गुन्हे

चालू वर्षात जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्यांत अशा २ हजार ९५ घटना समोर आल्या. यात ३,००९ जणांविरोधात पोलिसंात गुन्हा नोंदवला गेला आहे. याची सरासरी काढल्यास दिवसाला २३ गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.

पोलिस दादा, दीदी प्रभावी ठरावेत

पोलिस दलाने बालकांशी संवाद साधण्यासाठी पाेलिस दादा आणि पोलिस दीदी हा उपक्रम राबवला आहे. मात्र तो फारसा प्रभावीपणे राबवला जात नाही. शाळांमधून मुलींना गुड टच, बॅड टच असे स्पर्शज्ञानाचे धडे देण्याची आवश्यकता आहे. यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. यामुळे आपल्याशी कुणी वाईट वर्तन करत असेल तर मुली त्या पालक, शिक्षक यांना सांगू शकतील, असे मत पोलिस अधिकाऱ्यांनी मांडले.

पालक, शिक्षकांनी ठेवावा संवाद

अनेकदा शिक्षक, नातेवाईक, शेजारी, इतर परिचित व्यक्तींकडून शोषण होत असल्याने मुली कुटंुबीयांना सांगत नाहीत. पालकांचा त्यांच्याशी मोकळा संवाद नसतो. शिवाय, शाळा बंद होईल, आपल्यालाच दोषी ठरवले जाईल, ही भीती या मुलींत असते. त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांचे मनोबल वाढते. मुलींशी पालकांनी मोकळा संवाद ठेवल्यास मुली या गोष्टी पालक, शिक्षक यांना सांगू शकतील व असे प्रकार समोर येतील. - मनीषा तोकले, सामाजिक कार्यकर्त्या